छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन…

0
3

पिंपरी, दि . १४ ( पीसीबी ) – छत्रपती संभाजी महाराज हे धाडसी आणि पराक्रमी तर होतेच शिवाय ते युध्दनितीनिपुण कुशल लढवय्येही होते,आपल्या शौर्य व पराक्रमाच्या जोरावर त्यांनी राज्यकारभार करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली. स्वराज्यासाठी दिलेले त्यांचे योगदान भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

     पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

     यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशीला जोशी, उपलेखापाल अनिल कु-हाडे,महेश निगडे यांच्यासह कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. 
    छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शाहूनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यातआले. यावेळी माजी नगरसदस्य नारायण बहिरवाडे,माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे,उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते कुशाग्र कदम,धनाजी येळकर पाटील, जितेंद्र छाबडा , सागर तापकीर , जीवन बोराडे,वैभव जाधव,रामराजे बसवणे , काशिनाथ नखाते , प्रविण कदम ,सतिष काळे , निलेश टेमकर , राजेंद्र घावटे, प्रशांत जाधव,यांच्यासह नैरोबी केनिया येथील स्टॅनले मंडुंकू, जाॅन वानजोही, इमॅन्युअल ओव्हारे, सॅमसुंग कॅथर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांनी मराठीसह हिंदी,इंग्रजी, संस्कृत, फारसी आदी भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्यांची विद्वत्ता केवळ राजकीय किंवा युद्ध कौशल्यातच नव्हे, तर साहित्यिक क्षेत्रातही प्रखरपणे दिसून येते. ‘बुधभूषण’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला असून ग्रंथात राजा, प्रशासन, युद्ध, आणि राज्यव्यवस्था यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केलेले आहे, हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांच्या विद्वानतेचे प्रतीक मानला जातो.