छत्रपती संभाजी महाराज पुतळा स्मारकाच्या कामात गोलमाल

0
148

ब्रांन्झचा पुतळा, मग सुट्या भागांना तडे कसे गेले ?

पिंपरी, ल. ३१ (पीसीबी) –  भ्रष्टाचारात बुडालेले प्रशासन, राज्यकर्ते आणि ठेकेदारांमुळेच निकृष्ट दर्जाचे काम झाले आणि मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३८ फुटी उंच पुतळा कोसळला. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे राज्यातील सर्वात उंच म्हणजे १०० फूट उंच अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा स्मारक कामातसुध्दा तोच प्रकार निदर्शनास आल्याने खळबळ आहे. प्रकरण दडपण्यासाठी राज्यकर्ते आणि प्रशासनात पळापल सुरू आहे.
अत्यंत जबाबदार अशा माध्यम प्रतिनिधींनी मोशी येथे जिथे हे काम सुरू आहे तिथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. भयंकर वास्तव समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला. अव्वल दर्जाच्या ब्रांन्झ धातुपासून बनविलेले संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुटे भाग दोन वर्षांपासून पडून असल्याचे स्पष्ट दिसले. पुतळ्याच्या पायाच्या आणि छातीच्या सुट्या भागाला भले मोठे तडे गेल्याचे सर्वांनीच पाहिले. पत्रकारांकडे त्याचे फोटोसुध्दा उपलब्ध आहेत. पुतळा उभारणीसाठी अशा प्रकारे तडे गेलेले सुटे भाग जोडूनच नंतर संपूर्ण पूतळा उभा राहणार असल्याने सर्वांच्या मनात धस्स झाले. भविष्यात इथेही मालवणसारखी दुर्घटना घडली तर या विचारानेच थरकाप उडाला. महापालिका आयुक्तांना त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता त्यांनी सुरवातीला`नो कमेंट` म्हणत हलक्यात घेतले. मात्र, बातम्या सुरू झाल्यावर पळापळ झाली आणि अद्याप पुतळ्याची जोडणी व्हायची आहे, पूर्ण खबरदारी घेणार आहे, असे लटके स्पष्टीकरण ते देऊ लागले. चौकशीचे शुक्लकाष्ट मागे लागायला नको म्हणून माध्यमांतून बातम्याच येऊ नयेत यासाठीही दबावतंत्र वापरण्यात आले. सोशल मीडियातून बातम्या-फोटो व्हायरल झाल्यावर राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, आता हाच मुद्दा भाजप विरोधकांच्या हातात लागल्याने भाजप नेत्यांची तारांबळ सुरू आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या विषयावर आवाज उठविणार आहे.

मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील सेक्टर ५ आणि ८ मधील सुमारे साडेसहा एकर जागेवर ६० कोटी रुपये खर्चाचा हा स्मारक प्रकल्प आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना प्रकल्प मंजूर केला आणि तत्काळ ऑगस्ट २०२० मध्ये त्याचे आदेशही देण्यात आले. कामाची मुदत १८ महिने होती. भाजप नेत्यांशी संबंधीत धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीकडे हे काम देण्यात आले. पीएमआरडीएने या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात अडिच एकर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे (पीसीएमसी) सुपूर्द केली. दोन वर्षांपूर्वी २० फूट उंच चौथऱ्याचे काम पूर्ण झाले. त्यासाठी १२ कोटी रुपये महापालिकेने अदा केले. नंतर संभाजी भिडे गुरूजी यांनी जागेची पाहणी करून परिसरात उंच इमारती झाल्याने ही जागा योग्य नसल्याचे सांगितले. दरम्यान, दुसरी जागा निश्चित केली आणि तिथे ४० फूट चौथरा बांधण्यासाठी १५ कोटींचे काम पुन्हा धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीकडेच देण्यात आले.


दरम्यानच्या काळात दोन वर्षांपूर्वी प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या नवी दिल्ली येथील स्टुडिओतून पुतळ्याचे सुटे भाग शहरात आले. स्मारकाच्या जुन्या जागेतच ते ठेवण्यात आले. पुतळ्याचा खर्च ३२ कोटी रुपये असून आजवर २२ कोटी रुपये अदा कऱण्यात आले आहेत. आजवर सुमारे ६० कोटींच्या खर्चापैकी ४० कोटी रुपये खर्च झाला आहे.

मालवण येथील पुतळ्याचे प्रकरण गाजत असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील पुतळे किती सुरक्षित आहेत, काय परिस्थिती आहे त्याचा आढावा बातमीदार घेत आहेत. अशातच संभाजी महाराज पुतळ्याचे हे विदारक सत्य समोर आल्याने मोठा भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता आहे. एक चूक झाकण्यासाठी भाजपचे नेते आता दुसरी चूक करत आहेत. चौथऱ्याचा १२ कोटी रुपये खर्च वाया गेल्याची टीका सुरू झाल्याने नवीन प्रस्ताव मांडण्यात आले. पुतळ्याच्या जुन्या जागेवरच खर्चाचे समर्थन म्हणून तिथे छत्रपती संभाजी राजे यांचे मामा सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या २० फूट पुतळ्याचे नियोजन केले आहे.


प्रश्नांचे उत्तर प्रशासन देणार का –
१) संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी झालेला १२ कोटी रुपये खर्च वाया गेला, त्याला जबाबदार कोण ?
२) पुतळा सुटे भाग ब्रांन्झ धातुचे असताना त्याला तडे गेलेच कसे ?
३) धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीकडे पुतळा उभारणीचा अनुभव आहे का ?
४) स्मारकाची जागा चुकिची आहे, हे सल्लागारांना समजले नाही का ?
५) राज्यांतील अन्य शहरांत अशा प्रकारे झालेल्या स्मारकांचा खर्च पडताळून पाहिला का?
६) पुतळ्याचे काम महापालिकेने राम सुतार यांना दिले की, धनेश्वर कंपनी मार्फत देण्यात आले?
७) शहरातीलल पूल, पदपथ, इमारती अशी सर्वच कामे एकमेव धनेश्वर कंपनी कशी ?