- महापालिका सभेत शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांचा घनाघाती आरोप
पिंपरी, दि. १३ – देशातील सर्वात भव्य अशा मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा स्मारकात मोठा भ्रष्टाचार असल्याचा विषय शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सर्वसाधारण सभेत चर्चेत आणला. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी प्राण दिले आणि तुम्ही त्यांच्या नावाखाली पैसे खाताय, अशी अत्यंत खरमरीत टीका त्यांनी सत्ताधारी भाजपवर केली आणि या प्रकल्पाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली.
दोन वर्षांपासून सुमारे ६५ कोटी रुपये खर्च करूनही पुतळ्याचे काम अर्धवट आहे. दोनच दिवसांपूर्वी सौ. उबाळे यांनी या प्रकरणाचा सर्व पर्दाफाश पत्रकार परिषदेत केला होता. मूळचे २५-३० कोटींचे काम ६०-६५ कोटींपर्यंत कसे गेले, कोणी नेले, त्याला जबाबदार कोण, तांत्रिक मान्यता कोणी दिली, मूळ एस्टिमेट अगोदरच फुगवल्याचे सौ. उबाळे यांनी उघड केले. आज महापालिका सर्वसाधारण सभेत या प्रकल्पाच्या मूळ खर्चापेक्षा अधिकचा खर्च कसा झाला याचा जाब सौ. उबाळे यांनी विचारला. स्थायी समितीत या विषयावर खुलासा होईपर्यंत तो तहकूब करण्याचा निर्णय झाला आणि भाजपची मोठी नाचक्की झाली. आज महापालिका सभेत उबाळे यांनी हिंदुत्वाची मशाल घेऊन मिरवणाऱ्या भाजपला असे बोल सुनावले की त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.
प्रशासनाला विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही म्हणून सौ. उबाळे या भयंकर संतापल्या. ज्या कंपनीकडे काम दिले ती धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी महापालिकेत कोणी, कशी आणली याची २०१४ पासूनची कुंडलीच उबाळे यांनी मांडली. फक्त महापालिकेच्या पैशावर धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी गेल्या १० वर्षांत इतकी मालमाल कशी झाली याचे काही दाखले सौ. उबाळे यांनी दिले. इंद्रायणीनगरला ४-५ बंगले झाले कसे झाले असा प्रश्नही उबाळे यांनी उपस्थित केला.
पुतळ्याची पहिली वीट रचली होती तेव्हापासूनच्या कामाची तांत्रिक तपासणी आणि खर्चाचा तपशिल उबाळे यांनी मागितला. छत्रपती संभाजी महाराजांची थोरवी इतकी आहे की विरोध करण्याता प्रश्नच येत नाही आणि आम्हीसुध्दा क्षात्रधर्म मानतो, असेही उबाळे यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाच्या कामात सुरवातीला जागा बदलल्यामुळे किमान १२ ते १५ कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाले त्याची जबाबदारी निश्चित करा, हा पैसा कुणामुळे गेले याचे उत्तर द्या, अशी मागणी केली. कामाचे मूल्य अधिक दाखवल्याने आज तब्बल २५ कोटी वाया घालवलेत त्याची जबाबदारी कोणाची असा खडा सवाल सौ. उबाळे यांनी केला.
पुतळ्च्या नावाखाली कोणी लपायचा प्रयत्न करायचा नाही आणि यापुढे छत्रपती संभाजी महाराजांचे नावसुध्दा घ्यायचे नाही, असेही सौ. उबाळे यांनी ठणकावले. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वतःचे प्राण दिले आणि तुम्ही त्यांच्या नावाखाली पैसे खाताय, अशा कठोर शब्दांते सौ. उबाळे यांनी भाजपच्या नेत्यांची अक्षरशः निर्भत्सना केली. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.











































