छत्रपती संभाजीनगर,दि.२९(पीसीबी) – छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील एका व्यावसायिकाची पत्नी डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानी तरुणासोबत पळून गेली होती. ती त्याच्यासोबत सौदी अरेबिया व लिबियाला निघून गेली. आता ती ३ ऑगस्टला देशात परतलेली आहे. दरम्यान, तिचा काही आतंकवादी संघटनांसोबत संपर्क आल्याची माहिती मिळत आहे. यातूनच तिचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असण्याचाही ई-मेल पोलिसांना मिळाला आहे. यामुळे गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली असून एटीएस तपास करत आहे. आता महिलेच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, मूळ मालेगावची २४ वर्षीय महिलेचे सिडकोतील एका व्यावसायिकासोबत २०११ मध्ये लग्न झाले होते. ती २०२२ मध्ये वडिलांसोबत सौदीमध्ये गेली होती. तेथे तिची एका पाकिस्तानी तरुणासोबत ओळख झाली. देशात परत आल्यानंतरही ती त्याच्या संपर्कात राहिली. ‘सोशल मीडिया’वरून ओळख वाढल्यानंतर तीने डिसेंबर २०२२ मध्ये त्याच्यासोबत देश सोडला.
दरम्यान याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. मात्र १८ ऑगस्टला पोलिसांना एक मेल आला, त्यात काही गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. डिसेंबरमध्ये ती गेल्यानंतर जानेवारी महिन्यात पतीला तिने पाकिस्तानी नागरिकासोबत लग्न केल्याचा कॉल प्राप्त झाला. सूत्रांच्या मते पतीला काही फोटो सुद्धा मिळाले आहेत. यातूनच तिचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असण्याची संशय पोलिसांना असून त्या दिशेने एटीएसने तपास सुरू केला आहे.










































