मुंबई, दि. 05 (पीसीबी) : महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक तथा छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या जाहिरातीवर आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या जाहिरातीत छत्रपती शाहू महाराज यांचा फोटो छापण्यात न आल्याने संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला. “जाहिरातीमध्ये महापुरुषांची फोटो छापले. मात्र शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही. महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. भाजपने ही चूक दुरुस्त करावी”, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. यावेळी संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.
“निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते. देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्र सुपर पॉवर कसं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही राज्याला इतका इतिहास नाही तितका इतिहास महाराष्ट्राला आहे. त्यामुळे नवीन महाराष्ट्र घडवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात असावा ही माझी अपेक्षा आहे. ईव्हीएमबद्दल अनेक पक्षांचे वेगवेगळे तर्क आहेत. त्यामध्ये न पडता आता पुढे कसं जाता येईल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. केंद्रात आणि राज्यात आता तुमच्याकडे सत्ता आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक प्राधान्याने सोडवावे. जे जे शब्द दिले होते ते आता त्यांनी पुन्हा एकदा सोडवावे”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
“मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकवणार हे सरकारने सांगावे. ते टिकणार नसेल तर मग मराठा समाजाला कसे आरक्षण देणार? हे सांगणे गरजेचे आहे. माझा काही सल्ला मागितला तर याबाबत मी सल्ला द्यायला तयार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करेक्ट टायमिंगला वकील न दिल्यामुळे आरक्षण उडालं. दोनदा एसईबीसी आरक्षण उडाल्यामुळे तिसऱ्यांदा कशा पद्धतीने टिकेल हे मराठा समाजाला सांगितलं पाहिजे”, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली.
“सगळ्या समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे हे आता पाहणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे पाच वर्षे आहेत तर ताकदीन हा मुद्दा मांडला पाहिजे. आरक्षणाबाबत तुमच्या मनामध्ये काय आहे हे सांगितलं पाहिजे. शपथविधी सोहळ्याला कशामुळे विलंब झाला हे मला सांगता येणार नाही. तिसरी आघाडी चिंतन करूनच आता पुढे जाईल. बच्चू कडू यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा देखील पराभव झाला. विकासाचं राजकारण करायचं आहे. ही भूमिका घेतली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र उंचीवर आहे त्या महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेलं पाहिजे. टॅगलाईनच्या माध्यमातून धर्माधर्मात, जाती-जातीत भेद निर्माण करणे हे वाईट आहे. मोठ्या पुढार्यांना असं बोलणं शोभत नाही”, असं संभाजीराजे छत्रपती यांनी सुनावलं.
“सगळ्या गडकोट किल्ल्यांवर जे अतिक्रमण झालं आहे ते निघालं पाहिजे. कोणत्याही धर्माचं अतिक्रमण असेल तर ते काढलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांवर अतिक्रमण होता कामा नये. शपथविधी सोहळ्याला मला निमंत्रण आहे. मात्र प्राधिकरणाच्या बैठकीमुळे मला जाता येणार नाही”, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.