छगन भुजबळ यांना राज्यपालपद मिळण्याचं भाकित

0
20

नागपूर, दि. 17 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेल्याने नाराज झाले आहेत. त्यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमधील येवला मतदारसंघाकडे धाव घेतली. त्यानंतर पक्षातील नेत्यांनी भुजबळांच्या नाकदुऱ्या काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र आता महायुतीतील बड्या नेत्याने चक्क छगन भुजबळ यांना राज्यपालपद मिळण्याचं भाकित वर्तवलं आहे.

भाजप आमदार आशिष देशमुख यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेलेल्या नाराजांविषयी प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की कुणाला डच्चू देण्याचा प्रश्नच नाही. नवीन सरकार स्थापन झालं आहे. भरघोस आमदार महायुतीतील प्रत्येक पक्षाकडे आलेत

ओबीसी नेतृत्व डावललं का?
छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व डावललं जात आहे का, असं विचारलं असता आशिष देशमुख म्हणाले, की आम्ही ओबीसी समाजाचे आहोत. वेळ आल्यावर एकत्र येऊन छगन भुजबळांसोबत आम्हीही आंदोलनही केलं आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल, तर नक्कीच त्यामध्ये त्यांचा मोठा निर्णय होणार असेल, असं मत आशिष देशमुख यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना व्यक्त केलं.

राज्यपाल करण्याचे भाकित
देशाच्या कोणत्या ना कोणत्या राज्याचे राज्यपाल भुजबळ होणार असतील, असंही होऊ शकतं, त्यांना राज्यपाल करण्याची योजना त्यांच्या पक्षाने बनवली असेल, त्यांचं मोलाचं योगदान येणाऱ्या काळात सामाजिक जीवनात पाहायला मिळेल, असा आशावाद आशिष देशमुख यांनी बोलून दाखवला.

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
छगन भुजबळ यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ‘भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणाबाजीत निदर्शने केली. भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशाराही यावेळी दिला