चौदा निवडणुका लढलेले शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार ?

0
56

बारामती, दि. 05 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत, सभा घेत आहेत, त्यावेळी बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या असंही यावेळी शरद पवारांनी म्हटलं आहे.

“मी सत्तेत नाही. मी राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत 14 निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे” असंही बारामतीत दौऱ्यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

आपल्या विचारांचे सरकार आले तर भक्कमपणे युगेंद्र प्रश्न सोडवेल
अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांनी हल्लाबोल केला आहे. ‘काही लोकं सांगतात, मी लोकांना सांगेल भावनेने आवाहन करेल, काही गरज नाही मी माझ्या लोकांना ओळखतो. सुप्रिया सुळे यांना 48 हजार मते जास्त देईल, त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपण आपले प्रश्न सोडवून घेऊया. मला आता आमदारकी नको , खासदारकी नको मला लोकांचे प्रश्न सोडवायचेत. जर आपल्या विचारांचे सरकार आले तर भक्कमपणे युगेंद्र इथले प्रश्न सोडवेल, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.

एका राज्याचं काम करत असाल तर पंतप्रधान कशाला होता?
तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्ही फक्त एका राज्याचं काम करत असाल तर पंतप्रधान कशाला होता? जाऊन तिथे मुख्यमंत्री व्हा. माझी काही तक्रार नाही. पण हे जे काही घडतं आहे ते राज्याच्या हिताचं नाही. देशाच्या हिताचं नाही. अनेक राज्यात हाताला काम नाही. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची, ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही.शेतीला पाणी आणि हाताला काम यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तरच सरकारचा दृष्टीकोण चांगला राहतो. दुर्दैवाने दिल्ली आणि राज्याचे राज्यकर्ते त्या दृष्टीने काम करत नाहीत, असा हल्लाबोल शरद पवारांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर केला आहे.