दि .२४(पीसीबी) – ‘देव अस्तित्वात आहे की नाही याविषयी मतभेद होऊ शकतात; पण देवत्वाची प्रचिती साहित्यातून येते!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना डॉ. न. म. जोशी बोलत होते. संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, आकाशवाणी पुणेचे निवृत्त संचालक गोपाळ अवटी, संतसाहित्याचे अभ्यासक ह. भ. प. उमेशमहाराज बागडे, मोई येथील इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब गवारे, माजी संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. न. म. जोशी पुढे म्हणाले की, ‘आजच्या भ्रष्ट सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मूल्यविवेक जागृत करणारे हे इंद्रायणी साहित्य संमेलन आहे. मोठ्यांनी लहानांच्या पाठीशी असावे ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे अन् याचा प्रत्यय या ग्रंथदिडीतील बालवारकरी आणि त्यांच्या पाठीमागे चालणारे मान्यवर या दृश्यातून आला. साहित्याने प्रबोधन करू नये, असे समीक्षकांचे मत असले तरी साहित्याने उद्बोधनाचा आनंद द्यावा, याविषयी दुमत नाही. इंद्रायणी साहित्य संमेलन ही उद्बोधनाची यात्रा आहे!’ बोधकथा, दृष्टान्त आणि कुसुमाग्रज यांचे संदर्भ उद्धृत करीत जोशी यांनी प्रतिपादन केले.
संमेलनाध्यक्षा डाॅ. सीमा काळभोर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, ‘मराठी भाषा हा मानवतेचा वारसा आहे!’ असे प्रतिपादन करीत म्हणाल्या की, ‘संत मांदियाळीने मराठीला लोकभाषा नव्हेतर अभिजात भाषा बनवली आहे. तो दर्जा अबाधित ठेवणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. भजन, कीर्तन, तमाशा, लोकनाट्य यांसह सर्व लोककला आपल्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हीच लोकसंस्कृती महाराष्ट्राचा आत्मा आहे. अहिल्यादेवी या लोकाभिमुख शासक होत्या, त्यांच्या नावाच्या साहित्यनगरीत आपण वाचनसंस्कृतीकडे वळणे ही काळाची गरज आहे!’ याप्रसंगी ‘संवेदनांची साद’ या अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका प्रकाशित करून वितरित करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. पौर्णिमा कोल्हे संपादित ‘अरुण बोऱ्हाडे यांची अक्षरवारी’ या ग्रंथाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
गोपाळ अवटी यांनी, ‘साहित्य केवळ मनोरंजन करीत नाहीतर जीवनविषयक दृष्टिकोन तयार करते. निष्क्रिय मनोरंजनापेक्षा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असतो, हेच इंद्रायणी साहित्य संमेलनाचे फलित आहे!’ असे गौरवोद्गार काढले. स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे यांनी, ‘इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थी, महिला आणि सर्व नागरिकांना साहित्य क्षेत्राची अद्ययावत माहिती मिळते!’ असे मत व्यक्त केले.
अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून, ‘तंत्रज्ञानाच्या अतिक्रमणातून वाचनसंस्कृती लोप पावत आहे. त्यामुळे ‘जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य या भूमीत निर्माण झाले!’ हे ब्रीद उराशी बाळगून आपली भाषा अन् संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न या सर्वसमावेशक संमेलनाच्या माध्यमातून करीत आहोत. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त ‘अहिल्यादेवी होळकरनगरी’ हे संमेलनस्थळाचे नामकरण केले आहे. तसेच महिला संमेलनाध्यक्षाची निवड यांतून स्त्रीशक्तीचा गौरव करण्याची परिषदेची भावना आहे!’ अशी माहिती दिली. उद्घाटनापूर्वी, श्री नागेश्वरमहाराज मंदिर, मोशी ते संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप तापकीर यांनी आभार मानले.











































