चोवीस तासात शहरातील आमदार, खासदारांनी भूमिका स्पष्ट करावी : मराठा क्रांती मोर्चा

0
346

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भर आंदोलने करत आहे.पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मराठा समाज साखळी उपोषणासह विविध आंदोलने करत आहे. परंतू या बाबत शहरातील चार आमदार महेश लांडगे, आण्णा बनसोडे, अश्विनीताई जगताप व उमाताई खापरे तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही.

या विषयी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आमदार खासदार यांचे विषयी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या 24 तासात आमदार,खासदार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.असे न केल्यास झोपेत असलेल्या आमदार,खासदार यांना जागे करण्यासाठी लवकरच शहरातील मराठा समाज तुमच्या भेटीला येईल असा इशारा देण्यात आला.या बैठकीस सतिश काळे,प्रकाश जाधव,मारूती भापकर,धनाजी येळकर पाटील, नकुल भोईर, वैभव जाधव, मीरा कदम, सुनिता शिंदे, कल्पना गिडडे, नानासाहेब वारे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात सर्व गावांतून राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे. अनेक शहरांतून जाळपोळ सुरू आहे. दोन खासदार, तीन आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन मनोज जरांगे यांचे समर्थन केले आहे. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील आमदार, खासदार कोणतीच भुमिका घेत नसल्याने मराठा समाजातील कार्यकर्ते नाराज आहेत. पुणे-मुंबई सह अन्य शहरांतून किमान पाठिंबा पत्रक किंवा सरकारकडे पाठपुराव्याबाबत आश्वासने दिली आहेत. पिंपरी चिंचवड शहरात असे एकाही नेत्याचे पत्र नसल्याने तो चर्चेचा विषय आहे. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम संभवतो, असा इशारा दिला आहे.