चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांना रॉडने मारहाण

0
137

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) शिरगाव, – चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या शिरगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना चौघांनी मिळून मारहाण केली. एका पोलिसाला लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 7) दुपारी दोन वाजताच्या सुमारास साळुंब्रे येथे घडली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

नईम शहा (वय 23), नसीम शहा (वय 35), कलीम शहा (वय 25), नसीम मुदही (वय 24), कलीम मुदही (वय 18, सर्व रा. गोडूंब्रे, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अली अब्दुल शेख यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार अली अब्दुल शेख हे शिरगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. ते एका चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींच्या भंगार दुकानात गेले होते. त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार अनिल निरवणे देखील होते. चोरीला गेलेल्या मालाचा तपास करत असताना त्यांनी आपण पोलीस असल्याचे आरोपींना सांगितले होते. तरी देखील आरोपींनी अली शेख आणि अनिल निरवणे यांना शिवीगाळ केली.

आरोपी नईम शहा याने लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डोक्यात मारले. त्यांनी हात मध्ये घातला असता त्यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर इतर आरोपींनी लोखंडी रॉडने हातावर, पायावर, पाठीवर मारून खाली पाडून जखमी केले. पोलीस अंमलदार अनिल निरवणे यांनाही धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.