चोरलेल्या दारूच्या बाटल्या घेऊन जाण्यास विरोध केल्याने वेटरवर चाकूने वार

0
213

देहूगाव, दि. २८ (पीसीबी) – हॉटेलमध्ये दारूच्या बाटल्या चोरलेल्या बाहेर घेऊन जाण्यास वेटरने विरोध केला. यावरून चोराने विरोध करणाऱ्या वेटरवर चाकूने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 27) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास देहूगाव येथील एम एस हॉटेल मध्ये घडली.

इंद्रजीत बालाजी डुकरे (वय 29, रा. देहूगाव) असे जखमी वेटरचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनू उर्फ आशुतोष दिगंबर एकलारे (वय 22, रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंद्रजीत आणि आरोपी सोनू हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सोनू याने इंद्रजीत काम करत असलेल्या हॉटेलमधून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या चोरल्या. हा प्रकार इंद्रजीत याने पाहिला. त्याने सोनू याला चोरलेल्या दारूच्या बाटल्या बाहेर घेऊन जाण्यास विरोध केला. या कारणावरून सोनू याने इंद्रजीत याच्यावर हॉटेलमधील चाकूने सपासप वार केले. यामध्ये इंद्रजीत याच्या गळ्यावर आणि गालावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी सोनू याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.