चेनचोरी, वाहन चोरी करणारे दहा जणांचे टोळके एकाचवेळी पोलिसांच्या जाळ्यात, “असा” लावला सापळा

0
347

पिंपरी,दि.२३(पीसीबी) – चेनचोरी तसेच वाहन चोरी करणारे दहा जणांचे टोळके पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात अडकले आहे. या टोळक्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज जप्त करत 22 गुन्ह्यांची उकल केली आहे.

महम्मद मुस्ताक सिद्दिकी (वय 24, रा. लातूर), पांडुरंग बालाजी कांबळे (वय 23, रा. लातूर), तुषार उर्फ बाळ्या अशोक माने (वय 24, रा. तळेगाव दाभाडे), अर्जुन संभाजी कदम (वय 25, रा. लातूर), पक्षाल मनोज सोलंकी (वय 23, रा. चिंचवड), मुराद दस्तगीर मुलानी (वय 36, रा. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्या चार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निगडी, चिखली, भोसरी परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, महिलांच्या अंगावरील दागिने, वाहन चोरी करणारे तसेच चिखली येथे तोडफोड केलेले संशयित आरोपी चिखली परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मोहम्मद, पांडुरंग, तुषार, अर्जुन आणि त्यांच्या चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. तसेच चोरीचे दागिने विकणारे आणि विकत घेणारे पक्षाल व मुराद या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्वांकडून चार कोयते, एक तलवार, पाच दुचाकी, सात मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख 92 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी पिंपरी चिंचवड शहरासह लातूर जिल्ह्यात देखील अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.

निगडी, चिखली, एमआयडीसी भोसरी, भोसरी, देहूरोड, दिघी, लातूर ग्रामीण आणि एमआयडीसी लातूर पोलीस ठाण्यात चेन चोरीचे तेरा गुन्हे दाखल आहेत. तर भोसरी, रावेत, देहूरोड, चिखली या पोलीस ठाण्यांमध्ये वाहन चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. मोबाईल चोरी तसेच तोडफोडीचे देखील काही गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे एकूण 22 गुन्ह्यांची उकल झाली आहे.