चेंडूला हात लावला म्हणून दलित तरुणाचा अंगठा कापला…!

0
396

गुजरात,दि.०८(पीसीबी) – मैदानात क्रिकेट खेळताना दलित समाजातील एका मुलाने चेंडूला हात लावला म्हणून त्याच्या काकाचा अंगठा कापल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर तालुक्यात असलेल्या काकोशी गावात हा प्रकार घडला असून तलवारीने अंगठा कापण्यात आला आहे. किर्ती परमार असे या दलित तरुणाचे नाव आहे.

आयडी सेलिया हायस्कूलच्या मैदानात काही लोक क्रिकेट खेळत होते. यावेळी किर्ती परमारच्या पुतण्याने त्यांच्या चेंडूला हात लावला. यामुळे क्रिकेट खेळणाऱ्यांनी या मुलाला हटकले. त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे धीरज परमार (किर्ती परमारचा भाऊ) याने मध्यस्थी करत शिवीगाळ करण्यापासून रोखले. यामुळे दोन्ही गटात वाद निर्माण झाला. क्रिकेटचा सामना संपल्यानंतर आम्ही तुला धडा शिकवू अशी धमकी धीरज परमारला क्रिकेट खेळणाऱ्या कुलदीप याने दिली.

सामना संपल्यानंतर कुलदीप आणि त्याचा समूह धीरजकडे गेला. या दोन्ही गटात पुन्हा वाद निर्माण झाला. इतर लोकांनी मध्यस्थी करून या दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर क्रिकेट खेळणारे तिथून निघून गेले. धीरज आणि त्याचा पुतण्याही तिथून निघून गेला. परंतु, किर्ती परमार तिथेच चहाच्या टपरीवर बसला होता. रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कुलदीप आणि इतर सहाजण तलवारी आणि काठ्या घेऊन तीन वाहनांतून त्या मैदानात परत आले.

किर्ती एकटाच असल्याने या समूहाने त्याच्यावर हल्ला केला. यात त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली असून उजव्या हातावरही जखमा आहेत. त्याला बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध झाला होता. हा सर्व प्रकार घडल्यानंतर एका स्थानिक दुकानदाराने धीरजला फोन केला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, इतरांना शोधण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.