चीनमधून भारतात आयात होणाऱ्या वस्तुंच्या प्रमाणात 7.2 टक्क्यांनी घसरण

0
241

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – चीन आणि भारतादरम्यान मोठ्याप्रमाणात व्यापार होतो. भारत चीनमधून विविध गोष्टींची आयात करतो. मात्र त्याप्रमाणात निर्यातीचे प्रमाण कमी आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या ट्रेंडमध्ये बदल पहायला मिळत आहे. याबाबत वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी संसदेमध्ये माहिती दिली आहे. अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020-21 मध्ये चीनमधून भारतात आयात होणाऱ्या वस्तुंच्या प्रमाणात 7.2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. या घसरणीसह आयात 65.21 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ती 2018 -19 मध्ये 70.31 अब्ज डॉलर इतकी होती. आयात कमी झाली असून, निर्यातवाढली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये निर्यात 21.18 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये निर्यात ही 16.75 अब्ज डॉलर इतकी होती. याचाच अर्थ निर्यातीमध्ये तब्बल 26 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कोरोना काळात व्यापारात वाढ
जगावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते. कोरोनाकाळात भारत आणि चीन दरम्यानच्या व्यापारात मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. 2021 मध्ये भारत आणि चीनमधील व्यापार वाढून 125.6 अब्ज डॉलरवर पोहोचला. पहिल्यांदाच व्यापाराने 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी भारताने चीनकडून 97.5 अब्ज डॉलरची आयात केली तर 28.1 अब्ज डॉलरच्या वस्तूंची चीनला निर्यात केली आहे. भारत, चीन व्यापारामध्ये गेल्या वर्षी व्यापारी तूट 69.4 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे.

व्यापारी तूट वाढली –
भारत आणि चीनदरम्यान कोरोना काळात व्यापारामध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या काळात आयात सात टक्क्यांनी घटली आहे. तर निर्यातीमध्ये तब्बल 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र तरी देखील व्यापारी तूट मोठ्याप्रमाणात निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी भारत आणि चीनदरम्यानच्या एकूण व्यापरी तूट 69.4 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे. केवळ चीन सोबतच नव्हे तर अन्य देशांसोबत देखील भारताच्या निर्यातीचे प्रमाण वाढले असून, भारताच्या निर्यातीने चारशे अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.