चीनची थेट भूतानमध्ये घुसखोरी; एक गावच वसवले!

0
498

बीजिंग दि. २१ (पीसीबी) : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन दरम्यान असलेला तणाव निवळण्याची चिन्हं दिसत असताना आता चीनने ईशान्य भारताच्या सीमेवर आगळीक करण्यास सुरुवात केली आहे. चीनने भारतासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या डोकलाम भागाजवळ बंकर आणि मजबूत रस्ते बांधले असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच चीनने भूतानच्या सीमेत घुसखोरी करत गाव वसवले असल्याचे समोर आले होते.

भारत-चीनचे सैन्य २०१७ मध्ये डोकलाममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते. जवळपास ७० दिवस दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि चीन दरम्यान वाद झालेल्या क्षेत्रात चीनने सैन्य आणि दारूगोळा ठेवण्यासाठी बंकर बनवले आहेत. हे बांधकाम सिंचे-ला पासपासून जवळपास अडीच किमी अंतरावर आहे. सॅटेलाइट इमेजमधून याचा खुलासा झाला असून चीन या भागात आपली लष्करी ताकद वाढवत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.फोर्स अॅनालिसीसचे विश्लेषक आणि प्रमुख सॅटेलाइट इमेजरी एक्सपर्ट सिम टेक यांनी सांगितले की, चीनकडून नवीन बंकर निर्मितीचा उद्देश्य स्पष्ट असून त्यांना या भागात आपली ताकद वाढवायची आहे. या भागात युद्धजन्य परिस्थिती तयार झाल्यास तात्काळ हालचाल करून अधिक कुशलतेने लढाई करता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

भारतासाठी धोकादायक
चीनने भूतानच्या हद्दीत गाव वसवल्यानंतर या भागात ९ किमीचा रस्ता तयार केला आहे. यामुळे चिनी सैन्याला जोंपलरी डोंगराळ भागात जाण्यासाठी एक पर्यायी रस्ता तयार केला आहे. भारतीय सैन्याने २०१७ मध्ये चीनला या जोंपलरीमध्ये जाण्यापासून अडवले होते. चिनी सैन्याला २०१७ मध्ये जोंपलरीपर्यंत रस्ता बनवायचा होता. हा मार्ग भारतीय सैन्याच्या डोका ला पोस्टपासून जातो. हा भाग सिक्कीम आणि डोकलाच्या सीमेवर आहे. चिनी सैन्य जोंपलरी डोंगराळ भागात पोहचल्यास त्यांना भारताच्या चिकन नेक समजले जाणाऱ्या सिलगुडी कॉरिडोअरवर थेट लक्ष ठेवता येऊ शकते. सिलगुडी कॉरिडोअर हा ईशान्य भारताला उर्वरीत भारताशी जोडून ठेवतो. त्यामुळे हा भाग भारतासाठी महत्त्वाचा आहे.