चिन्ह आणि नाव गोठवणे हा मराठी माणसाच्या अस्मितेवरचा घाला – जयदीप ठाकरे

0
285

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. तर, ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ आणि शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे. प्रकरणावरती जयदेव ठाकरेंचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

“शिवसेना हे नाव पणजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी दिलं. ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि ‘शिवसेना’ नाव मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार असून, त्यांची अस्मिता आहे. शिवसेनेच्या वाढीसाठी मोठा संघर्ष आणि मेहनत करण्यात आली. पक्षाच्या माध्यमातून अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, एवढी घरे चालत आहे. मात्र, चिन्ह आणि नाव गोठवणे हा मराठी माणसाच्या अस्मितेवरचा घाला आहे,” असे जयदीप ठाकरेंनी म्हटलं.

शिवसेनेला मिळालेल्या नवीन चिन्हावर बोलताना जयदीप ठाकरे म्हणाले, “मशाल हे क्रांतीचे प्रतिक असून, शिवसेना क्रांती घडवणार. बाळासाहेबांचे नाव जरी शिंदे गटाने घेतलं असलं, तरी रक्त आमच्याकडे आहे. लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. ते देतील ती जबाबदारी स्वीकारेल,” असेही जयदीप ठाकरेंनी स्पष्ट केलं. ते टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.