भोसरी एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीला कच्चा माल पुरवठा करणाऱ्या चिनी कंपनीचा बनावट ई-मेल आयडी वापरून ५५ लाख २५ हजार ९७४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना २ ते ६ एप्रिल दरम्यान घडली.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बाबूराव जाधव (४०, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ते ६ एप्रिल दरम्यान फिर्यादी यांची कंपनी चीनमधील ‘वेंझू आर्टेक मशिनरी टेक्नॉलॉजी’ कंपनीकडून कच्चा माल खरेदी करते. अज्ञात आरोपीने या चिनी कंपनीचा मूळ ई-मेल आयडी असल्याचा भास निर्माण करून कंपनीला मेल पाठवला. त्यात बँकेचे तपशील बदलल्याचे सांगून अमेरिकेतील सिटिझन्स बँक खाते क्रमांक दिला. कंपनीने विश्वास ठेवून ५९ हजार १७९.७८ अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनानुसार ५५.२५ लाख रुपये) त्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.














































