चित्रपट लेखकाला दगडाच्या धाकाने लुटले; चित्रपटाच्या हार्डडिस्कही पळवल्या

0
597

तळेगाव दाभाडे, दि. ६ (पीसीबी) – भर दिवसा जुना पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे 12 जणांच्या टोळक्याने एका चित्रपट लेखकाला दगडाच्या धाकाने लुटले. लेखकाकडील चित्रपटाच्या हार्डडिस्कही आरोपींची काढून घेतल्या. ही घटना शनिवारी (दि. 4) दुपारी चार ते साडेचार या कालावधीत घडली.

शंकर निवृत्ती भेंडेकर (वय 29, रा. पिंपरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लिंबाजी भीमराव मुंढे (वय 38), संग्राम अशोक मुंढे (वय 26, दोघेही रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ), ज्ञानेश्वर बजरंग सकट (वय 19, रा. शिरगाव, ता. मावळ), सुमित सुरेश कदम (वय 23, रा. गोडुंब्रे, ता. मावळ), अमर मारप्पा वाघमारे (वय 30, रा. मामुर्डी, देहूरोड) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर अनोळखी आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर भेंडेकर हे सिनेमा लेखक आहेत. चित्रपटासाठी लिंबाजी मुंढे याने पैसे दिले होते. त्यामुळे लिंबाजी याला पैसे देण्यासाठी फिर्यादी भेंडेकर हे शनिवारी दुपारी लिंबाजी याच्या ऑफिस समोर गेले. त्यावेळी आरोपींनी शंकर भेंडेकर यांना दगडांचा धाक दाखवून त्यांच्याकडील दहा लाख रुपये, संमती पत्र, हक्कसोडपत्र व पखवाज या फिल्मच्या सहा हार्ड डिस्क जबरदस्तीने पळवून घेऊन गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.