पिंपरी, (दिनांक : ३० एप्रिल २०२३) “चित्ताला नियंत्रित करणे म्हणजे योग होय. आसने किंवा व्यायाम हा त्यातील एक छोटासा भाग आहे; परंतु आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म निष्ठेने करणे म्हणजेही योग होय!” असे प्रतिपादन ज्येष्ठ योग अभ्यासक हिरामण भुजबळ यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवड येथे शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘योग एक जीवनशैली’ या विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना हिरामण भुजबळ बोलत होते. दूरसंचार विभागातील निवृत्त अधिकारी सां. रा. वाठारकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर माजी नगरसेवक सुरेश भोईर, पिंपरी – चिंचवड योगविद्याधामचे उपाध्यक्ष प्रवीण महादर, सूरज सुपेकर आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पलाश आयुष यांनी हे व्याख्यानपुष्प प्रायोजित केले होते.
हिरामण भुजबळ पुढे म्हणाले की, “इसवीसन पूर्व २०० वर्षांपूर्वी १९५ सूत्रांच्या माध्यमातून पतंजली ऋषींनी योगशास्त्राची परिपूर्ण माहिती संपूर्ण जगाला करून दिली. भगवान शंकरापासून योगनिर्मिती झाली असे मानले जाते. उपनिषदे आणि भगवद्गीता यांमध्ये योगाचे वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी, ‘प्रत्येक व्यक्ती योगी आहे. मात्र, त्या व्यक्तीने योगसूत्रांचे आचरण केले पाहिजे, असे गीतेत म्हटले आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे अष्टांग योगाचे मुख्य घटक आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशांमुळे माणूस दु:खी होतो; पण अष्टांग योगामुळे या दु:खांचे निवारण होते.
दहाव्या शतकात गुरू गोरक्षनाथांनी संपूर्ण जगात योगाचा प्रसार केला होता. हठयोग म्हणजे राजयोग होय. त्यामध्ये कुंडलिनी जागृत करण्याची प्रक्रिया आहे. मन, बुद्धी, अहंकार यांचे एकत्रीकरण म्हणजे चित्त होय. चित्त नियंत्रित करण्यासाठी योगसाधना करावी. कोरोना, हृदयविकार, मधुमेह अशा अनेक विकारांवर योगसाधना उपयुक्त ठरते. सदोष जीवनशैलीमुळे विकार होतात; परंतु पन्नास टक्के संतुलित आहार, पंचवीस टक्के योगासने आणि पंचवीस टक्के आयुर्वेद यांच्या समन्वयातून निरामय आरोग्य लाभते!” अशी माहिती हिरामण भुजबळ यांनी दिली.
प्रवीण महादर यांनी पिंपरी – चिंचवड योगविद्याधामच्या माध्यमातून एक हजारांहून अधिक योगशिक्षक घडविले आहेत, अशी माहिती दिली. सूरज सुपेकर यांनी फळे, सॅलड, कच्च्या फळभाज्या यांचा आहारात समावेश केल्यास उत्तम आरोग्य लाभते, असे मत व्यक्त केले. व्याख्यानापूर्वी, वीर बोरा या बालकाने बालशिवाजीची वेषभूषा परिधान करून प्रतापगडाचा पोवाडा सादर केला.
गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सूरज भोईर यांनी सूत्रसंचालन केले. महेश गावडे यांनी आभार मानले