चिखली मध्ये तरुणावर गोळीबार; दोघे जखमी

0
175

चिखली, दि. १३ (पीसीबी) – चिखली परिसरात वैयक्तिक वादातून गोळीबार झाला. यामध्ये एक तरुण जखमी झाला. तर आरोपीच्या मित्राला देखील गोळी लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 12) सायंकाळी घडली.

अजय सुनील फुले (वय 19, रा. मोहननगर) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षल सोनावणे (रा. जाधववाडी, चिखली), श्याम चौधरी, कीर्ती भिऊलाल लिलारे अशी आरोपींची नावे आहेत. कीर्ती लिलारे हा गंभीर जखमी झाला आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा गॅस रिफिलिंगचे काम करतो. अजय आणि आरोपी यांच्यात मागील पाच ते सहा महिन्यांपासून वाद सुरू होते. अजय त्याच्या दुकानात असताना आरोपी रविवारी सायंकाळी दुकानात आले. त्यातील हर्षल याने अजयवर गोळीबार केला. यामध्ये अजय जखमी झाला.

या गोळीबाराच्या घटनेत हर्षल याने झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी त्याचाच साथीदार कीर्ती लिलारे याला लागली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी व जखमी यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ही घटना वैयक्तिक वादातून झाली असल्याने या घटनेचा निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचे उपआयुक्त डॉ. पवार यांनी सांगितले.

एक आरोपी रुग्णालयात आहे. उर्वरित दोन आरोपींपैकी एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकने ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले.