- अनधिकृत मजल्यांच्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई…
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दोन दिवसांपासून शहरात विविध भागांत नव्याने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तसेच अतिक्रमाणांवर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत प्रशासकीय काळात झालेल्या सर्व अनधिकृत बांधकामांना अभय देण्यात आले आहे. पूर्वीच्या जनहित याचिकेत तत्कालिन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी शहरात अनधिकृत बांधकाम झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई कऱण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते. प्रत्यक्षात उच्च न्यायालयाचा अवमान आताच्या प्रशासनाकडून झाल्याने अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा येण्याची शक्यता असल्याने कारवाईचा फार्स सुरू आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेल्या अतिक्रमण कारवाईत चिखली, तळवडे आणि रुपीनगर येथील महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या मजल्यांचे तसेच पत्रा शेडचे ६८२१ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली १२ अनधिकृत बांधकामे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
चिखली,रुपीनगर आणि तळवडे येथील कारवाईमध्ये फ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या नेतृत्वात महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच कारवाई दरम्यान या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निष्कासन कारवाईमध्ये पोकलेन व जेसीबी यांचा वापर करण्यात आला. शिवाय यावेळी इतर महापालिका यंत्रणेसह पोलीस प्रशासनाचे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अधिकारी,कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.
महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई मध्ये चिखली,तळवडे आणि रुपीनगर येथील अनधिकृत बांधकामांचा समावेश होता. येथील इमारती मध्ये अनधिकृत पद्धतीने उभारलेले इमारतींचे मजले तसेच पत्र्यांच्या बांधकामांवर महापालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.