चिखलीत व्यापा-याच्या घरी चोरी; तीन लाख 72 हजारांचा ऐवज चोरीला

0
363

चिखली, दि. १ (पीसीबी) – मोरे वस्ती चिखली येथे अज्ञात चोरट्याने एका व्यापा-याच्या घरी चोरी केली. व्यापा-याची पत्नी घराचा दरवाजा उघडा ठेऊन शेजारच्या महिलेशी गप्पा मारत असताना चोरट्याने ही चोरी केली. ही घटना सोमवारी (दि. 30) सायंकाळी सहा ते आठ वाजताच्या कालावधीत घडली.

हरिश्चंद्र यदुराज यादव (वय 52, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यापारी आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांची पत्नी घरी होत्या. त्या घराचा दरवाजा उघडा ठेऊन शेजारच्या महिलेशी गप्पा मारत थांबल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून सहा तोळे सोन्याचे दागिने, एक जोडी चांदीचे पैंजण, 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.