चिखलीतून अपहरण झालेल्या मुलीची हिमाचल प्रदेश मधून सुटका

0
561

चिखली, दि. २४ (पीसीबी) – चिखली मधून अपहरण झालेल्या 13 वर्षीय मुलीची हिमाचल प्रदेश मधील पहाडी भागातून चिखली पोलिसांनी सुटका केली. आरोपीच्या ताब्यातून मुलीला सुखरूपपणे सोडवण्यात आले आहे. सुरोज रेजाउल शेख (वय 21, रा. कुदळवाडी, मूळ रा. मुर्शिदाबाद, पश्चीम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या महिरीतीनुसार, चिखली येथे जाधववाडी परिसरात राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखत चिखली पोलिसांनी तपास सुरु केला. चिखली परीसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी केली असता मुलगी एका अज्ञात तरुणाबरोबर जात असल्याचे आढळले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता आरोपी कुदळवाडी परीसरात चिकन सेंटरवर काम करणारा सुरोज शेख असल्याची माहिती मिळाली.

सुरोज हा मुर्शिदाबाद, पश्चीम बंगाल येथील मुळ रहिवाशी असल्याची माहिती चिखली पोलिसांनी मिळवली. त्या अनुषंगाने तपास करण्यात आला, मात्र तो मूळगावी गेला नसल्याचे समजले. तसेच त्याचा मोबाईल फोन बंद असल्याने तपासात अडचणी आल्या.

दरम्यान त्याच्या संपर्कातील व्यक्तीबाबत माहिती काढली असता तो नियमितपणे रुपसिंग ठाकुर या नेपाळी तरुणाच्या संपर्कात होता. रुपसिंग ठाकुरच्या मोबाईलचे तांत्रीक विष्लेषण केले असता तो चंदिगड ते सिमला, हिमाचल दरम्यानच्या पुर्व बाजुकडील गावामध्ये वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चिखली पोलिसांचे एक पथक तात्काळ त्याठिकाणी रवाना करण्यात आले. दोन दिवस चंडीगड ते सिमला हिमाचल प्रदेश दरम्यानच्या पुर्व बाजुस असणा-या पहाडी भागातील खेडेगावामध्ये शोध घेतला असता आरोपी सुरोज हा भोजनगर येथे एका ठेकेदाराकडे मजुरीचे काम करत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने मुलीला फूस लावून पळवून आणल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातील पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक उध्दव खाडे, पोलीस अंमलदार अमर कांबळे, सुरज सुतार, कबीर पिंजारी या पथकाने कामगिरी केली.