पिंपरी, दि.७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पालिकेकडून बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या चिखली येथील बस स्टॉप जवळील विक्रेत्यांसाठी कायमस्वरूपी जागा देण्यात आली. या हॉकर्स झोनचे अनुक्रमांक वितरण करण्यात आले.
यामुळे फेरीवाल्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या गाळ्याचे अनुक्रमांक वितरण आयुक्त राजेश पाटील यांचे मार्गदर्शनानुसार ‘फ ‘ क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, प्रशासन अधिकारी महेंद्र चौधरी , फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, शारदा राक्षे, सुखदेव कांबळे,जरीता वाठोरे, बरगल्ली गावडे, संगीता देशमाने आदीसह फेरीवाले उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पेठ क्रमांक 17 व 19 चिखली येथे स्वस्त घरकुल योजनेच्या ठिकाणी बस स्टॉपच्या जवळ मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांची गर्दी होत होती. ग्राहकांची पण गर्दी मोठ्या प्रमाणात होती. यामुळे या ठिकाणी बस येणे – जाणे अडचणीचे झाले होते. या ठिकाणी पाणी योजनेचे काम सुरू झाले असून नलिका टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणची गर्दी पाहता त्यांना हॉकर झोन (भाजी मंडई )निर्माण करून देण्यात आली. त्या ठिकाणी सुमारे 80 विक्रेत्यांना याचा लाभ झाला आहे. पार्किंगची व्यवस्था व सुटसुटीत प्रत्येकांना गाळे देण्यात आले.
सिताराम बहुरे म्हणाले की, “दिलेल्या जागेमध्ये व्यवस्थित नीटनेटकेपणा व्यवसाय करावा. महापालिकेचे नियम व स्वच्छतेचे पालन करण्यात यावे”. नखाते म्हणाले की, “फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळावी म्हणून महासंघाकडून अनेक वेळा फार मोठा संघर्ष झाला. घरकुल येथील विक्रेत्यांना मोठमोठ्या अडचणींना, अतिक्रमण कारवाईला सामोरे जावे लागले, अशांसाठी कायम जागा मिळणे हे आनंदाची बाब आहे. उर्वरीत विक्रेत्यांना ही लाभ देऊ, शहरातील इतर ठिकाणच्या विक्रेत्याला कायम हॉकर्स झोन व न्याय देण्याची भूमिका महासंघ नेहमीच घेईल.”