दि. १९ (पीसीबी) – चिकुनगुनिया विषाणूच्या नवीन प्रकाराने संपूर्ण शहरात कहर केला आहे. हा आजार इतिहासात पहिल्यांदाच भयावह, जीवघेणी लक्षणे दाखवत आहे. चिंतेची बाब म्हणजे, यात अर्धांगवायूसारख्या गंभीर आजाराचाही समावेश आहे.
चिकुनगुनियाच्या या धोकादायक अवतारामुळे डाॅक्टरदेखील गोंधळले आहेत.
संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी तातडीने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) या प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच चिकुनगुनियाच्या विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.
पुण्यातील संसर्गजन्य रोगतज्ज्ञांच्या मते, एकेकाळी सांधेदुखी आणि ताप यासाठी ओळखला जाणारा चिकुनगुनिया आता मोठी आणि धोकादायक लक्षणे दाखवत आहे. यापूर्वी दोन हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवलेल्या शहरात यापूर्वी कधीही न पाहिलेली लक्षणे आता या आजारात दिसत आहेत. हा विषाणू डेंगीची नक्कल करत असल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या विचित्र लक्षणांमुळे आता डॉक्टरदेखील गोंधळले आहेत.
राष्ट्रीय डेंगीतज्ज्ञ आणि केईएम हॉस्पिटलमधील आयसीयू आणि डेंगी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गादिया यांनी या संदर्भात 'सीविक मिरर'सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, "या लक्षणांपैकी सर्वात धक्कादायक लक्षण म्हणजे नाक काळे पडणे. भूतकाळातील चिकुनगुनियाचा या वैशिष्ट्याशी कधीही संबंध नाही. हे पाहता आताचा चिकुनगुनिया अधिक चिंताजनक आहे. या लक्षणामुळे रुग्णांना सुमारे दोन आठवडे चालणे-फिरणेदेखील कठीण होत आहे.याची लागण झालेल्यांपैकी सुमारे २० टक्के रुग्णांचे नाक काळे झालेले आढळले. हे यापूर्वी कधीही दिसून आले नव्हते. यामुळे रुग्णांना घराबाहेर पडण्यास संकोच वाटत आहे.''
अर्धांगवायूची लक्षणे
गादिया यांच्या म्हणण्यानुसार, सर्वात धक्कादायक आणि धोकादायक लक्षण म्हणजे अनेक चिकुनगुनिया रुग्णांमध्ये अर्धांगवायूची लक्षणे दिसत आहेत. चिकुनगुनियामुळे इतकी गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
“रुग्णांच्या मज्जातंतूचे नुकसान होत आहे आणि अनेकांना अर्धांगवायू होत आहे. माझ्या ओपीडीमध्ये याच्या दररोज सरासरी ३० नवीन केसेस येत आहेत. गेल्या सहा ते आठ आठवड्यात एक हजाराहून अधिक चिकुनगुनियाचे रुग्ण मी तपासले आहेत. यापूर्वी कधीच अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. चिकुनगुनियाच्या या नव्या गंभीर प्रकाराचे रुग्ण इतक्या जास्त प्रमाणावर आहेत की, त्यामुळे डॉक्टर मेटाकुटीस आले आहेत. वाघोली, प्रभात रोड, चंदननगर, हडपसर, बीटी कवडे रोड, कल्याणीनगर, आळंदी, मोशी, चाकण आणि भोसरी यासारख्या भागात अनेक कुटुंबांमध्ये याची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे,” असे सांगताना शहरावरील चिकुनगुनियाची पकड दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे गंभीर वास्तव डाॅ. गादिया यांनी निदर्शनास आणून दिले.
चिकुनगुनिया नियंत्रणाबाहेर जाऊन संभाव्य प्राणघातक महामारीत रूपांतरित होत असताना, पुण्यातील शीर्ष संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी आता ‘एनआयव्ही’ची मदत घेतली आहे.
डाॅ. गादिया आणि त्यांच्या निरीक्षणांशी सहमत असलेले नोबल हॉस्पिटलचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी या प्रकरणी ‘एनआयव्ही’ने त्वरित हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, यावर जोर दिला. ते म्हणाले, ”या वेळचा ताण अत्यंत धोकादायक आहे. हे लहान मुलांवर आणि कॉमोरबिडीटी असलेल्या लोकांवर गंभीरपणे परिणाम करत आहे, ज्यामुळे पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि अगदी क्वाड्रिप्लेजिया सारख्या मोठ्या गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. म्हणून या नवीन स्ट्रेनमध्ये काय घडत आहे हे समजून घेण्यासाठी आम्हाला ‘एनआयव्ही’ची मदत आवश्यक आहे.”
हे भयंकर परिवर्तन कशामुळे झाले हे निर्धारित करण्यासाठी गादिया आणि द्रविड यांनी सध्याच्या चिकुनगुनियाच्या स्ट्रेनच्या अधिकृत क्रमवारीची विनंती केली आहे. ‘एनआयव्ही’च्या हस्तक्षेपाशिवाय परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि हिवाळा सुरू होईपर्यंत चालू राहू शकते, असा इशारा देतानाच या डॉक्टरांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि चिकुनगुनिया आणि डेंग्यूमधील फरक ओळखण्यासाठी लवकर तपासण्याचे आवाहन केले आहे. डेंगीची शंका दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी ‘एनएस वन’ चाचणीची शिफारस केली. त्यानंतर चिकुनगुनियाची तीव्रता वाढण्यापूर्वी पहिल्या पाच दिवसात पीसीआर चाचण्या करण्यास सुचवले आहे.
डेंगीच्या लक्षणांशी साधर्म्य
चिकुनगुनियाची लक्षणे आता डेंगीच्या लक्षणांशी साधर्म्य साधणारी आहेत. लक्षणांच्या या नकलेमुळे वैद्यकीय तज्ज्ञांचा गोंधळ उडत असल्याचा दावादेखील डाॅ. गादिया यांनी केला.
“रुग्णांच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी होण्यासारख्या गुंतागुंत निर्माण होत आहेत. ही डेंगीची लक्षणे आता चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. प्लेटलेटची संख्या अचानक कमी होणे, हे तर अधिकच भयावह आहे. कारण हे पूर्वी कधीही चिकुनगुनियाचे लक्षण नव्हते. प्लेटलेट्स आता पाच हजारांच्या धोकादायक पातळीपर्यंत घसरत आहेत. यामुळे चिकुनगुनियाचा नवा विषाणू जीवघेणा बनला आहे. पूर्वी चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स ८०,००० ते ९०,००० च्या खाली गेल्याचे आम्हाला कधीच दिसले नाही. यामुळे रुग्णाला डेंगीची लागण झाली आहे की चिकुनगुनियाची, याचे निदान करताना डॉक्टरांचा गोंधळ उडतअसल्याकडे राष्ट्रीय डेंगीतज्ज्ञ आणि केईएम हॉस्पिटलमधील आयसीयू आणि डेंगी विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गादिया यांनी लक्ष वेधले.
अर्धांगवायूसोबतच आणखी धक्कादायक लक्षण म्हणजे नाक काळे पडणे. भूतकाळातील चिकुनगुनियाचा या वैशिष्ट्याशी कधीही संबंध नाही. चिकुनगुनियाचे सुमारे ३० टक्के रुग्ण आता उलट्या आणि गॅस्ट्रोच्या लक्षणांसह येत आहेत. हे कधीच झाले नव्हते. हा व्हायरस सतत नवनवीन लक्षणे दाखवत आहे. याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. चिकुनगुनियाचा हा नवीन प्रकार म्हणजे आणखी एक ताप नाही, तर तो जीवघेणा ठरत आहे.
- डॉ. राजेश गादिया, राष्ट्रीय डेंगीतज्ज्ञ आणि आयसीयू आणि डेंगी विभागप्रमुख, केईएम हॉस्पिटल










































