पिंपरी, दि. १८ ऑगस्ट (पीसीबी) – बांगला देशातील हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी मिळून आज रविवार सकाळी मोर्चा काढला आहे.खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे,आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, भाजप शहर अध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयसेवक संघ, बजरंगदल, दुर्गा वहिनी आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे पुतळा, चिंचवड स्टेशन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी या मार्गावर हे भगवे वादळ आले आहे.
मोर्चाच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या.
१) बांगलादेशामध्ये हिंसक आंदोलनातून सत्तांतर झाले आणि तेथील हिंदू, जैन, बौद्ध अल्पसंख्य समाज विनाकारण भरडला गेला. हिंदू, जैन, बौद्धांवर अमानुष हल्ले, अत्याचार, क्रूर हत्या सुरू होऊन आजही होत आहेत. भारत सरकारला विनंती आहे की हे थांबविण्यासाठी सक्षम भारत सरकारने हस्तक्षेप करावा.
२. CAA कायद्यानुसार बांगलादेशामधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्धांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी.
३. आपल्या पुणे जिल्ह्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर, बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत याचे सर्वेक्षण तातडीने करावे. त्यांच्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका उत्पन्न झाला आहे. त्यांच्यामुळे भारतीय तरुणांचा रोजगार हिरावला जात आहे. भारतीय संस्कृतीला त्यांच्यामुळे धोका उत्पन्न झाला आहे. बांगलादेशी मुसलमान घुसखोर
आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोर शोधून ताबडतोब देशाबाहेर हाकलून देण्यासाठी युध्य पातळीवर प्रयत्न करावे.