चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी २० जणांनी ३४ उमेदवारी अर्ज नेले

0
303

चिंचवड, दि.३१ (पीसीबी)-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी २० जणांनी ३४ उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीच्या प्रत्येक एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिघांनी तसेच अपक्ष १२ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वाटप व सादर करण्यासाठी मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. ७ जानेवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

उमेदवारी अर्ज वाटप व सादर करण्याच्या पहिल्या दिवशी २० जणांनी अर्ज नेले आहेत. भारतीय जनता पार्टीकडून बायडाबाई ऊर्फ कल्पना सुखदेव काटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून ऍड. अनिल बाळू सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माया संतोष बारणे, संभाजी बाळासाहेब बारणे, राजेंद्र गणपत जगताप, एमआयएमकडून जावेद शेख, वंचित बहुजन आघाडीकडून रविंद्र विनायक पारदे, पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीकडून रावसाहेब शंकर चव्हाण आणि अपक्ष म्हणून प्रफुल्ला शैलेंद्र मोनलिंग, हरीभाऊ ऊर्फ हरिष भिकोबा मोरे, भोसले मिलिंद राजे, रफिक रशिद कुरेशी, बाळू तुळशीराम शिंदे, दादाराव किसन कांबळे, वहिला शहेनू शेख, अविनाश तुकाराम गायकवाड, अजय हनुमंत लोंढे, सुधीर लक्ष्मण जगताप, बालाजी लक्ष्मण जगताप, सालारभाई उमरसाब शेख या २० जणांनी ३४ उमेदवारी अर्ज नेले आहेत.