चिंचवड विधानसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

0
55

मतमोजणी प्रक्रिया शांत, सौहार्दपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सहकार्य करा – निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांचे आवाहन

थेरगाव, दि. २२ (पीसीबी) : चिंचवड विधानसभा निवडणूकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी झाली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ही मतमोजणी प्रक्रिया शांत, सौहार्दपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी नागरिकांनी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.

चिंचवड विधानसभा निवडणूकीची मतमोजणी शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ पासून थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवनात पार पडणार आहे. निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आलेल्या सुरक्षा कक्षाचे सील मतमोजणीच्या दिवशी सकाळी ६ वाजता उमेदवार आणि त्यांचे निवडणूक प्रतिनिधी, निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना
चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीसाठी एकूण २९ टेबल लावण्यात आले असून २४ फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये ईव्हीएम, टपाली आणि ईटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) अनुक्रमे २४, ४, १ टेबल लावण्यात आले आहेत


मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी नियमावली
मतमोजणी प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने पुरविलेल्या ओळखपत्राद्वारे मतमोजणी परिसरामध्ये प्रवेश दिला जाईल. उमेदवारांना मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देताना त्यांची दोन स्तरावर तपासणी केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये नेमून दिलेल्या टेबल व्यतिरिक्त मतमोजणी प्रतिनिधींना इतरत्र फिरण्यास सक्त मनाई असेल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना याबाबत सूचना देणे अनिवार्य आहे. या अटी शर्तींच्या अधीन राहूनच उमेदवारांना तसेच त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणी परिसरात प्रवेश दिला जाईल.

उमेदवारांसह मतमोजणी व निवडणूक प्रतिनिधींनी वैध ओळखपत्र परिधान करणे अनिवार्य
मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. मतदान प्रतिनिधी एकदा मतमोजणी कक्षातून बाहेर गेल्यानंतर त्यास पुन्हा मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या ठिकाणी वागणूक वर्तणूकीच्या बाबतीत स्पष्ट निर्देश दिलेले असून शिस्तबद्ध वातावरणामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराने किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधीने किंवा मतमोजणी प्रतिनिधीने मतमोजणी परिसरामध्ये शिस्तीचा भंग केल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने भारतीय दंड संहिता लोकप्रतिनिधीत्व अधिनियम व तत्सम कायद्याप्रमाणे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले आहे.

वाहतुकीत बदल –
चिंचवड विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवनासमोरील मुख्य रस्ता बंद राहणार आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच अधिकृत माध्यम प्रतिनिधींना थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे प्रवेश दिला जाईल. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. १५० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपुर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. मतमोजणीच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी देखील निवडणूक प्रशासनास सहकार्य करून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे