चिंचवड विधानसभा निवडणूक: उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी पूर्ण

0
26

थेरगाव, दि. १० (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आज थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील बापुजी बुवा सभागृहात पार पडली.

निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक खर्च निरीक्षक पवन यादव यांच्या अधिपत्याखाली उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी प्रक्रिया पार पडली.

भारत निवडणुक आयोग कार्यालयाकडील निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी तीन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक अंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला असून, याद्वारे उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी दि. १३ नोव्हेंबर रोजी आणि तिसरी तपासणी दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहित वेळेत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे करण्यात आली असून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे उमेदवारांनी सादर केलेला खर्च तपासला जात आहे. पुढील दुसर-या आणि तिसऱ्या तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी सर्व उमेदवारांना दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रूपये इतकी आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २१ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी शॅडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदवला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते.