चिंचवड विधानसभा उमेदवारीचाशब्दपाहिजे म्हणून भाजपात नाराजीचे नाट्य

0
229

मावळ , दि १ एप्रिल (पीसीबी ) – मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहर भाजपमधील नाराजीचे खरे कारण आता समोर आले आहे. मावळ मधे माजी मंत्री बाळा भेगडे यांनाच पुन्हा विधानसभेला उमेदवारी देण्याचे ठोस आश्वासन खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने त्यांची नाराजी दूर झाली. आता त्याच प्रमाणे चिंचवड विधानसभेसाठी शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांनाच उमदवारी मिळेल, असा शब्द थेट फडणवीस यांनी द्यावा यासाठीच हे दबाव तंत्र सुरू असल्याचे समजले.
महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपला मिळावी अशी मागणी शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप आणि मावळातून माजी मंत्री भेगडे यांनी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि पिंपरी राखीवचे आमदार अण्णा बनसोडे यांनीसुध्दा बैठका घेन मावळ लोकसभा राष्ट्रवादिने लढविण्याची मागणी लावून धरली होती. बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही, असा इशाराही भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता. प्रत्यक्षात ही जागा शिवसेना शिंदे गटाकडेच कायम राहिली आणि दोन टर्म खासदार असलेल्या श्रींरंग बारणे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली.
उमेदवारी घोषीत झाल्यावर खासदार बारणे यांनी नाराज नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. सर्वात प्रथम त्यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आमदार आश्विनीताई जगताप आणि शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांची पिंपळे गुरव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोनच दिवसांत पाठोपाठ भाजपच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या शहर कार्यालयात बैठक घेतली आणि बारणें यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली. पक्षाचे प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस अनूप मोरे, शहर सरचिटणीस नामदेव ढाके, प्रवक्ते राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, उपाध्यक्ष बिभीषण चौधरी यांनी उघडपणे नाराजीचा सूर आळवला. भाजप प्रदेशकडून जोवर याबाबत गांभीर्याने दखल घेऊन शहराध्यक्षांना जोवर विश्वास देत नाहीत आणि शहराध्यक्ष जोपर्यंत कार्यकर्त्यांना आदेश नाहीत तोपर्यंत बारणे यांचे काम करणार नाही, असे थेट इशारा देण्यात आला. काही बूथ प्रमुख, पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करताना राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, प्रचाराचे नियोजन करायचे आहे असे सांगून बैठक निमंत्रीत केली होती. प्रत्यक्षात नियोजन सोडून बारणे यांना टार्गेट करण्यात आले. मावळात बाळा भेगडे यांना स्वतः फडणवीस यांनी फोन करून पुढच्या विधानसभा उमेदवारीची ग्वाही देत शांत केले. चिंचवड विधानसभेला पुन्हा जगताप कुटुंबात उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होत चालली आहे. आताच्या आमदार आश्विनीताई यांच्या कार्यपध्दतीवर जनतेत नाराजीचा सूर आहे. पुन्हा खासदार बारणे यांनीच उमेदवारी मिळाल्याने आता चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेला पुन्हा भाजप कोणाला संधी देणार हा कळीचा मुद्दा ठरला आहे. दिर की भावजय म्हणजेच शंकर जगताप की आमदार आश्विनीताई जगताप असा संभाव्य संघर्ष आहे. पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी खरे तर लोकसभा उमेदवारीसाठी भरपूर प्रयत्न केले मात्र बारणे यांच्यामुळे संधी मिळालीच नाही. आता विधानसभेला पुन्हा आश्विनीताईंनाच उमेदवारी दिली तर शंकरशेठ ला किमान विधान परिषद मिळायला पाहिजे, अशी सूप्त मागणी पुढे आली आहे.
दरम्यान, भाजपने आजवर तीन सर्वे रिपोर्ट घेतले. नागपूर येथील संस्थेच्या शिफारशीत नकारात्मक मतप्रदर्शन आल्याने पुन्हा भाजपमधून जगताप कुटुंबाला उमेदवारी मिळण्याची शक्यता दुरावली आहे. म्हणूनच लोकसभा निवडणूक ही संधी समजून शंकरशेठ जगताप समर्थकांनी मिळून दबाव तंत्र अवलंबले आहे. असंख्य निष्ठावंत भाजपच्या पाधिकाऱ्यांची या खेळीला साथ नसल्याचे समोर आले आहे. मोदी यांनी पंतप्रधान कऱण्यासाठी महायुतीत जो उमेदवार असेल त्याला विजयी कऱण्याचे आदेश भाजपने दिलेले असताना खासदार बारणे यांना खोडा घालून स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रदेश भाजप तसेच रा.स्व.संघाच्या वरिष्ठांना हा कावा ओळखला असून आता स्वतः फडणवीस त्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.