चिंचवड येथे रंगला सुमधुर गीतांचा कार्यक्रम

0
243

चिंचवड, दि.14 (पीसीबी)- ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘ या फुलांच्या गंधकोषी ,’ ‘ जीव रंगला दंगला,’ ‘ अनंता तुला कोण पाहू शके रे, ‘ अशा एकाहून एक सुमधुर गीतांनी मंगळवारी (दि.13) प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि ऋषीकेश रानडे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम रसिकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे उत्तरोत्तर रंगत गेला. निमित्त होते चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व ग्रामस्थांच्या वतीने चिंचवड येथे आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 461 व्या संजीवन समाधी महोत्सवाचे.

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरालगतच्या देऊळमळा येथील पटांगणावर 461 वा संजीवन समाधी महोत्सव सुरु आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (दि.13 ) रात्री हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच सर्व कलाकारांचा चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ऋषीकेश रानडे यांच्या ‘ तुझे गीत गाण्यासाठी’, या गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर केतकी यांनी ‘ हे श्यामसुंदरा राजसा ‘, हे गीत सादर केले. त्यानंतर ऋषीकेश यांनी ‘ या फुलांच्या गंधकोषी ‘, हे सुमधुर गीत सादर केले. त्यानंतर केतकी यांनी ‘ जिवलगा कधी रे येशील तू ‘, हे प्रसिद्ध गीत सुरेखपणे गायिले.

त्यानंतर ऋषीकेश यांनी ‘ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी , ‘ हे भक्तीगीत सुंदररित्या सादर केले. त्यानंतर केतकी यांनी संत मीराबाई यांची ‘ उड जा री ‘, हि रचना उत्कटपणे सादर केली. त्यानंतर ऋषीकेश यांनी ‘ कधी तू रिमझिम झरणारी बरसात ‘, हे उडत्या चालीचे बहारदार गीत सादर केले. त्यानंतर केतकी यांनी ‘ रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा ‘, हे गीत सादर केले. त्यानंतर ऋषीकेश आणि केतकी यांनी ‘ जीव रंगला – दंगला ‘ हे द्वंद्ववगीत सादर केले. त्यानंतर ऋषीकेश यांनी ‘ त्या पैलतीरावर मजला , ‘ हे गीत सादर केले.

केतकी यांनी संगीतबद्ध केलेली त्यांच्या आजोबांनी रचलेली ‘ गुरुदेवा दत्ता गुरूसूर्या ‘, ही रचना सादर केली. रसिकांच्या फर्माइशीवरून त्यांनी ‘ अनंता तुला कोण पाहू शके रे, ‘ हे गीतही सुरेख सादर केले. त्यानंतर ऋषीकेश यांनी ‘ विठ्ठल आवडी प्रेमभावो , ‘ कानडा राजा पंढरीचा,’ हि भक्तिगीते सादर केली. त्यानंतर केतकी यांनी ‘ तुज मागतो मी आता,’ हे गीत सादर केले. सर्वात्मका सर्वेश्वरा’, हे गीत सुरेख गाऊन ऋषीकेश यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

केदार परांजपे – सिंथेसायझर , निलेश देशपांडे – बासरी, प्रशांत पांडव – तबला, केदार मोरे – ढोलकी व पखवाज, अभय इंगळे – वेस्टर्न ऱ्हिदम, हार्मोनियम – प्रसन्न बाम यांनी साथसंगत केली. स्नेहल दामले यांनी निवेदन केले. स्मिता जोशी यांनी आभार मानले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात नितीन दैठणकर यांचे पारंपरिक सनई चौघडा वादन झाले. त्यानंतर श्री उचगावकर सर यांच्या सोहं योग साधना मंडळाच्या वतीने योगासन वर्ग घेण्यात आले. डॉ. वैद्य यांच्या सौजन्याने श्री शंकर महाराज सेवा मंडळातर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यानंतर स्थानिक भजनी मंडळांनी भजन सेवा सादर केली. ज्ञानदा पंडित आणि सहकलाकारांनी कीर्तन सेवा सादर केली. तसेच दिवसभर इतर धार्मिक कार्यक्रम झाले.

संस्कृत गीताला उदंड प्रतिसाद

केतकी यांनी ‘ प्रियकरा प्रियकरु प्रियकरा : प्रथमा ‘, हे संस्कृत गीत उत्कृष्टपणे सादर केले. रसिकांना बहुधा संस्कृत गीत प्रथमच ऐकायला मिळाल्यामुळे त्यांनीही या गीताला भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान कार्यक्रम उशिरा सुरु होऊनही रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अनेकजण व्यासपीठाच्या अगदी जवळपर्यंत जमिनीवर बसले होते तर अनेकांनी उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.