चिंचवड येथे गुरुवार, २७ मार्चपासून पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव

0
8

श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव यांनी गुरुवार, दिनांक २७ मार्च २०२५ पासून पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचे आयोजन केले आहे. बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथील स्वामी समर्थ मठाच्या प्रांगणात गुरुवार, दिनांक २७ मार्च २०२५ रोजी पहाटे ४:३० वाजता ‘श्रीं’चा पंचामृत अभिषेक व पूजा आणि ६:०० वाजता उत्सव कलश स्थापनेने उत्सवाचा प्रारंभ होईल. सायंकाळी ६:०० वाजता अवधूत गांधी यांचा अफलातून गाण्यांचा कार्यक्रम होईल. शुक्रवार, दिनांक २८ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकारी स्वरसमर्थ अभंगवाणी सादर करतील. शनिवार, दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता मानसी बडवे यांचे सुश्राव्य व्याख्यान होईल. रविवार, दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता योगेश तपस्वी बहारदार भक्तिगीते सादर करतील. सोमवार, दिनांक ३१ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता सुयश खटावकर ‘नाद अनाहत’ हा बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करतील. सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पिंपरी – चिंचवड आयुक्तालय वरिष्ठ अधिकारी जितेंद्र कोळी, स्वामी समर्थ शक्तिपीठाचे डॉ. गणेश शिंदे, श्री शंकर महाराज गोशाळेच्या अनिता जोगड आणि श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे संस्थापक कै. त्रिंबक भट यांना गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रकटदिन उत्सव काळात दररोज पहाटे ४:३० वाजता अभिषेक व पूजा आरती, सकाळी ८:३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत स्वामी स्वाहाकार, श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण, दुपारी १२ वाजता महानैवेद्य व आरती, भजनसेवा, कीर्तनसेवा, सामुदायिक रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक विधी संपन्न होतील. सोमवार, ३१ मार्च रोजी दुपारी १२:३० ते ३ या वेळेत महाप्रसाद वाटप होणार आहे. या पाच दिवसीय प्रकटदिन उत्सव सोहळ्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील) यांनी केले आहे.