चिंचवड पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर एट्रोसीटीचा गुन्हा

0
309

पिंपरी,दि.26 (पीसीबी)- एका व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या महिलेशी अश्लील भाषा वापरून संभाषण केले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या विरोधात एट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने न्यायलायात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी (दि. 25) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नागपूर येथील 38 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नागपूर येथे नोकरी करतात. ऑक्टोबर 2020 मध्ये फिर्यादी यांना चिंचवड पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यांना पोलीस ठाण्यात एका प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. फिर्यादी पोलीस ठाण्यात आले असता त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. फिर्यादी दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात आले.

त्यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी फिर्यादी यांना केबिन मध्ये बोलावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी सकाळी त्यांनी चिंचवड येथे एका महिलेचे छेड काढण्याचा आरोप फिर्यादीवर करण्यात आला. जर त्यांनी दुसऱ्या दिवशी महिलेची छेड काढली असेल तर आदल्या दिवशी त्यांना कसे बोलावण्यात आले, असा जाब फिर्यादी यांनी विचारला असता जाधव यांनी फिर्यादीस दमदाटी केली.

दरम्यान फिर्यादीस एका महिलेचा फोन आला. तिला एका व्यक्तीने त्रास दिल्याचे ती सांगत असल्याने तिला त्या व्यक्तीविरोधात तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी बोलावले. महिला पोलीस ठाण्यात आली असता जाधव यांनी फिर्यादी कडे दोन लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास महिलेशी गैरवर्तन करण्याची धमकी जाधव यांनी दिली. फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असता चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.