चिंचवड गावातील गणपती मंदिराची तोडफोड

0
600

चिंचवड, दि. ०४ (पीसीबी) – चिंचवड गावातील चिंचवडचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मंदिरात तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरु आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री पावणे बारा वाजता घडली.

चिंचवडचा राजा गणेशोत्सव मंडळ हे चिंचवड परिसरातील प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळ आहे. मंडळाने गणपती मंदिर उभारले आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर गणपती बाप्पाला त्या मंदिरात विराजमान केले जाते. त्या ठिकाणी सोमवारी रात्री एका व्यक्तीने मंदिराच्या दरवाजावर दगड मारून तोडफोड केली.

मंडळाचे अध्यक्ष योगेश मिरजकर आणि कार्याध्यक्ष महेश मिरजकर यांनी याबाबत माहिती दिली. सोमवारी रात्री मंदिराच्या समोर एक व्यक्ती आला. त्याने थोडा वेळ मंदिर परिसरात फिरून नंतर रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड घेऊन तो मंदिराच्या दरवाजावर मारला. यामध्ये दरवाजाची काच फुटली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र तो मनोरुग्ण असल्याचे सांगत त्याला रात्रीच सोडून देण्यात आले. या प्रकरणाची संपूर्ण परिसरात मंगळवारी सकाळी चर्चा झाली. त्यामध्ये तो व्यक्ती मनोरुग्ण नसून दारूच्या नशेत त्याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पुढील कायदेशीर कारवाईचे काम सुरु असल्याचे मिरजकर यांनी सांगितले.

यापूर्वी देखील याच मंदिरात दानपेटी फोडून पैसे चोरून नेल्याची घटना घडली होती. दोन घटना घडल्या त्यावेळी आम्ही शांत राहिलो. मात्र असे प्रकार वारंवार होत असल्याने आता आम्ही कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेतला असल्याचे महेश मिरजकर म्हणाले.