चिंचवड आणि मावळात भाजप-राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत ?

0
65

दि. ११ (पीसीबी) – राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपाचा घोळ संपत संपत नसल्याने २५ जागावंर मैत्रपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. जिथे ज्याचा आमदार, ती जागा त्या पक्षाला, असा सिटिंग-गेटिंगचा फॉर्म्युला महायुतीने निश्चित केला आहे. तसे झाल्यास किमान २५ मतदारसंघात भाजप बरोबर राष्ट्रवादीच्याही स्थानिक नेत्यांची अडचण होणार आहे. २०१९ मध्ये जिथे राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले तिथे आता दोन्ही पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघातही हाच पेच आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या जागेवर त्यांचे सख्खे दिर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. प्रत्यक्षात भाजप विरोधात बरोबरीतली नाही पण, थोडीफार अधिकची ताकद सर्व विरोधकांकडे आहे. २०१९ आणि नंतर २०२३ ला पोटनिवडणुकित त्याचे दर्शन झाले.

त्यामुळे आता महायुतीत भाजप बरोबर राष्ट्रवादी असूनही ताकदिचे उमेदवार इच्छुक म्हणून पुढे आल्याने पेच आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यात आपल्याला ही जागा भाजपकडे जाणार असल्याने राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी कुठल्याही परिस्थितीत लढण्याची भूमीका अगोदरच जाहीर केली आणि प्रचार सुरू केला आहे. दुसरे तगडे उमेदवार नाना काटे यांना पोटनिवडणुकित ९९ हजार मते मिळाल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यांनीही चिंचवडची जागा राष्ट्रवादीलाच मिळावी म्हणून जोर लावला आहे. संधी मिळाली नाहीच तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी काटे यांनी संधान बांधले आहे. भाजप विरोधात आजवर गरळ ओकली आणि प्रचार केला आता त्याच भाजपचा प्रचार करायचा जमत नसल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपचा प्रचार कऱणार नाही, कारण तसे झाले तर पुढे महापालिकेला आमचे अस्तित्वच संपून जाईल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. न पेक्षा चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी अशी मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या, अशी मागणी पुढे आली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अपक्ष उमेदवारीला जोरदार समर्थन दिले आणि १ लाख १२ हजार मते घेतली होती. जगताप हे कसेबसे निवडूण आले होते. पोटनिवडणुकित जगताप, काटे आणि कलाटे अशी तिरंगी लढत झाली आणि मतांच्या विभागणीत भाजप जिंकली होती. आता पुन्हा शंकर जगताप यांच्या विरोधात काटे किंवा कलाटे अशी दुरंगी लढत झाली तर भाजपचा पराभव होऊ शकतो. महायुती म्हणून भाजपचा प्रचार राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते कऱणार नाहीत आणि त्याचा विरोधकांनाच फायदा होऊ शकतो, अशी भिती भाजपला आहे. सोपा उपाय म्हणून मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या,अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील ज्या जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा विचार सुरू आहे त्यात मावळ चा मतदारसंघ आहे. मावळ मध्ये सुनील शेळके हे राष्ट्रवादी अजित पवार समर्थक आमदार आहेत. गेल्यावेळी भाजपचे नेते, माजी मंत्री बाळा भेगडे यांचा त्यांना मोठ्या फरकाने पराभव केला. सलग २५ वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता राष्ट्रवादी विरोधात भाजप असा महायुतीतच संघर्ष पेटला आहे. आता या जागेवर भाजपने जोरदार आग्रह धरला आहे. शेळके यांचा प्रचार कऱणार नाही, असा भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांची रोखठोक भूमीका आहे. गेलेली जागा पुन्हा मिळावयचीच म्हणून दिवंगत माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांचे पुतणे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भेगडे यांचे नाव उमेदवारीसाठी ठरले आहे. जागावाटपात मावळची जागा मिळाली नाहीच तर इथेही मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ द्या, अशी भाजपचीच मागणी आहे. तसे शक्य झाले नाहीच तर वेळप्रसंगी भाजपमधून अपक्ष म्हणून रविंद्र भेगडे यांना उभे करायचेच असाही कार्यकर्त्यांचा निग्रह कायम आहे. प्रदेश भाजप नेत्यांचीच ही व्युहरचना, असल्याची चर्चा आहे. मावळात राष्ट्रवादीपेक्षा भाजपची ताकद मोठी आहे आणि व्यक्तीनुसार पाहिले तर शेळके यांच्या तोडिस तोड एकही उमेदवार समोर नाही. पुन्हा शेळके हेच जिंकले तर भाजपचे या पंचक्रोशितील अस्तित्वच संपेल याची नेते, कार्यकर्त्यांना भीती आहे. महायुतीमधील दोन्ही घटकपक्षांत मैत्रीपूर्ण लढत झाली तर कोणाची किती ताकद ते समजेल, अशी भाजपची इच्छा आहे.