दि.०९(पीसीबी)- कविता, नाट्य छटा, गीतगायन, भारूड, नृत्य, विनोद सादरीकरण अशा एकाहून एक सरस अशा कार्यक्रमांनी चिंचवड येथील लिंक रोडवरील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रामध्ये रविवारी ( ता. ८ ) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.
या कार्यक्रमामध्ये पुराणकाळापासून आतापर्यंत होऊन गेलेल्या कर्तबगार महिलांचा परिचय संवादरूपात १९ महिलांनी सादर केला. यासाठी महिलांनी मनापासून कष्ट घेऊन उत्तम पाठांतर केले होते. याचे सादरीकरणही छानच झाले. त्याला उपस्थितांनी चांगली दाद दिली. या निमित्त अनेकांना या महिलांच्या कार्याचा परिचय झाला. संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांनी या कर्तबगार महिलांच्या जीवनकार्यावर आधारित गीत लिहिले होते. या गीताला संघाच्या कार्याध्यक्ष प्रिया जोशी यांनी शब्दांचा सुरेख साज चढविला. यावेळी महिलांनी स्वत : तयार केलेल्या खाद्य पदार्थांचे आणि वस्तूंचे स्टॉलही ठेवले होते. त्यालाही सर्व उपस्थितांचा खूपच चांगला प्रतिसाद लाभला. खवैयांसाठी तर हि चांगली मेजवानीच ठरली.
उमाताई पाडुलकर यांनी घेतलेल्या उखाणा स्पर्धेचा बक्षीस समारंभ ही यावेळी नगरसेविका अपर्णा डोके यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, नगरसेविका सविता आसवानी, नीताताई कुशारे आदी उपस्थित होत्या. संघाच्या वतीने या सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
नृसिंह पाडुलकर, अशोक नागणे, शाम ब्रम्हे, दिलीप पाटणकर, केदार हर्षे, विजय निकुंभ, रवींद्र कुलकर्णी, शशांक देशपांडे, माधवराव जोशी आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.











































