चिंचवडला निष्ठावंत उमेदवारालाच मिळणार संधी !

0
117

– एक निष्ठ पक्षाचा निर्धार विजयाचा, चिंचवडमध्ये भाजपचाच विजय
– माजी नगरसेवक शितल शिंदेंच्या बॅनरमुळे मोठी खळबळ
– पिंपरी, दि. ५ – (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. महायुती प्रमाणेच महाआघाडीतही इच्छुकांची संख्या वाढल्याने गोँधळ सुरू आहे. दरम्यान, भाजपमधून जगताप कुटुंबाच्या उमेदवारीवर पक्षातून आणि महायुतीचा भागीदार पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतूनही मोठा विरोध झाल्याने आता संघ, भाजपशी निष्ठा असलेल्या अत्यंत सर्वसामान्य इच्छुक कार्यकर्त्यांचे नावे चर्चेत आले आहे. दोन टर्म नगरसवेक असलेल्या शितल शिंदे यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. एक निष्ठ पक्षाचा निर्धार विजयाचा,चिंचवडमध्ये भाजपचाच विजय अशा आशयाचे मोठे होर्डिंग्ज माजी नगरसेवक शितल शिंदे समर्थकांनी लावल्याने भाजपमध्येच मोठी खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल येत्या आठवड्यात वाजणार आहे. चिंचवड मतदारसंघात भाजपमधून पक्षाचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप, मावळत्या आमदार अश्विनी जगताप, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे यांची नावे स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे हे सर्वजण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतून एकमेव राहुल कलाटे यांचे नाव पुढे आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे हे उमेदवारी मागत आहेत. दरम्यान, दोन्ही बाजुच्या सर्व इच्छुकांत गावकी भावकी असून एकमेव शिंदे यांचे नाव वेगळे असल्याने भाजपकडून धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपकडे असल्याने तिथे शंकरशेठ जगताप यांना उमेदवारी मिळणार असे जवळपास निश्चित होते. प्रत्यक्षात त्यांच्या नावाला भाजपमधून आणि दादांच्या राष्ट्रवादीतूनही जोरदार विरोध झाल्याने पेच निर्माण झाला. शंकरशेठ नको तर दुसरे नाव आताच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या नावाला पसंती आहे. दरम्यान, आता २२ वर्षे आमदारकी एकाच कुटुंबात असल्याने घराणेशाही नको या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार नवा चेहरा द्यायचा विचार सुरू आहे. संघ परिवार आणि भाजपशी संबंधीत म्हणून माजी नगरसवेक शितल शिंदे यांचे नाव वरच्या पातळीवर एक पर्याय म्हणून चर्चेत आहे. शिंदे यांचे वडिलांपासून संपूर्ण कुटुंब भाजप विचारांचे आहे. लोकसभा निवडणुकित बारामती लोकसभा मतदारसंघ असताना डॉ. प्रतिभा लोखंडे यांच्या प्रचारात शिंदे यांचा सहभाग होता. १९९२ च्या महापालिका निवडणुकित त्यांचे पिताश्री गोरख शिंदे यांना उमेदवारी होती, पण आयत्यावेळी बदलण्यात आली. स्वतः शितल शिंदे हे दोन टर्म भाजपचे नगरसेवक होते. २०१७ च्या पंचवर्षीकमध्ये स्थायी समितीचे दुसरे अध्यक्ष म्हणून शिंदे यांच्या नावाची शिफारस स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र, स्थानिक पातळीवर आमदारांनी त्यांच्या जागेवर दुसरे नाव टाकले. वारंवार डावलले गेल्याने शिंदे समर्थकांनी आता संधी मागितली आहे. भाजपमधील विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्या मुशीत तयार झालेले नेते इच्छुक म्हणून शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.

संघ स्वयंसेवक म्हणून शिंदे यांचा विविध उपक्रमांत कायम सहभाग असतो. आता अशा निष्ठावंताला एकवेळ संधी देऊन आमदार करायचा विचार परिवारात सुरू आहे.

चिंचवडला हवा पक्षनिष्ठ आमदार
चिंचवड विधानभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव आहे. भाजपला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत संघाच्या विचाराचा आमदार चिंचवडसाठी हवा आहे अशी चर्चांना जोर धरला आहे.