चिंचवडलाच दळवीनगर येथे मोटारीतून १४ लाख रुपयांची रोकड जप्त

0
272

पिंपरी, दि.२५(पीसीबी) : विधानसभा पोटनिवडणुकीत कसबापेठ, पुणे येथे भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप काल (दि.24 फेब्रुवारी) झाला. त्यानंतर काल रात्रीच चिंचवडमध्ये भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटतानाच पकडण्यात आले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांनी गुन्हा (एनसी) नोंदवला आहे.

या त्रिकूटाकडून एक लाख ७० हजार रुपयांची रोकड, भाजप उमेदवाराचे नाव व पक्षाचे चिन्ह कमळ चिन्हाच्या स्लिपा आणि मतदारांच्या नावाची यादी हस्तगत करण्यात आली आहे.

माधव मल्लिकार्जून मनोरे (वय ५,रा.रहाटणी), स्वप्नील सुरेश फुगे (वय ३५) आणि कृष्णा बालाजी माने (वय २४, दोघेही रा.फुगेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. मनोरे हा भाजपच्या प्रभाग ३३ चा अध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रहाटणीतील तांबे शाळेजवळ रात्री 10 वाजता ही कारवाई केली. नंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला बोलावले. या पथकातील विकास त्रिभूवन यांच्या फिर्यादीवरून यांची फिर्याद घेऊन वाकड पोलिसांनी काळेवाडी चौकीत एनसी नोंदवली.

एक लाख सत्तर हजारातील सर्व नोटा या दोन हजार रुपये मुल्याच्या आहेत. म्हणजे किमान एक मताला दोन हजार रुपये दिले जात असल्याचा अंदाज आहे. कालच सकाळी चिंचवडलाच दळवीनगर येथे एका मोटारीतून १४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.
तर त्याअगोदर तेथूनच ४३ लाख रुपये दुसऱ्या एका मोटारीतून नेताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानेच पकडले होते. त्यामुळे आतापर्यंत चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ५९ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.