चिंचवडमध्ये तीन घरफोड्या; पाच लाखांचा ऐवज चोरीला

0
148

चिंचवड, दि. 14 जुलै (पीसीबी) – चिंचवड परिसरातील सुदर्शननगर येथे तीन वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये घरे फोडण्यात आली. यामध्ये एकूण पाच लाख 19 हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. या घटना 12 जुलै रोजी सकाळी उघडकीस आल्या.निलेश राजेंद्र आळंदे (वय 36, रा. सुदर्शन नगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा जुलै रोजी रात्री आठ ते 12 जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत तीन घरफोड्या झाल्या. विमल अपार्टमेंटमधील निलेश आळंदे, इंद्रलोक अपार्टमेंटमधील चेतन भारत ठाकरे आणि विराज अपार्टमेंटमधील मनोज कांतीलाल मोदी यांच्या घरी चोरी झाली आहे. दरवाजाचे लॅच लॉक व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून 10.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ असा एकूण पाच लाख 19 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.