चिंचवडमध्ये चमत्कार होणार, की पुन्हा भाजप येणार -थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
523

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे होते असलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक आता खूप रंगात आली आहे. रिंगणात २८ उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यातच दिसते. तिरंगी लढतीत मतविभागणी आणि सहानुभूतीचा फायदा भाजपला होणार की, चमत्कार घडणार ते आता पहायचे. दरम्यान, मागच्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकित जगताप, कलाटे आणि काटे यांना तसेच २०१९ मध्ये जगताप आणि कलाटे यांच्या दुरंगी लढतीत कोणाला, कुठे, किती मते मिळाली होती याचा मागोवा घेतला तर आताच्या पोटनिवडणुकित काय होणार याचा परिस्थितीनुरुप थोडासा अंदाज तुम्हीसुध्दा बांधू शकता. फक्त दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या जागेवर त्यांच्या धर्मपत्नी अश्विनताई आहेत, हाच काय तो फरक.

२०१४ ची रणधुमाळी आठवा –
२०१४ मध्ये युती किंवा महाआघाडी नव्हती. त्यावेळीसुध्दा जगताप (भाजप), काटे (राष्ट्रवादी), कलाटे (शिवसेना) या तीन बलाढ्य उमेदवारांमध्येच मोठी रस्सीखेच झाली. अपक्ष मोरेश्वर भोंडवे आणि काँग्रेसच कैलास कदमसुध्दा आपापला वाटा घेऊन गेले. तब्बल ६० हजार १२१ मतांच्या फरकाने आमदार जगताप यांनी राहुल कलाटे यांच्यावर मात केली. त्यावेळी जगताप यांनी १ लाख २३ हजार ४५१, तर शिवसेनेचे कलाटे यांना ६३ हजार ३३०, राष्ट्रवादीचे नाना काटे यांना ४२ हजार ४३२ आणि अपक्ष मोरेश्वर भोंडवे यांना १३ हजार ९३४ मते मिळाली होती. काँग्रेसचे कदम यांना आठ हजारावर मते होती. आमदार जगताप यांच्या समोरील सर्व विरोधकांना मिळून जवळपास बरोबरीतच म्हणजे १ लाख २७ हजार ६९६ मते होती. मतविभागणीचा पूरेपूर फायदा आमदार जगताप यांना मिळाला होता. खरे तर, आमदार जगताप यांची मतविभागणीची खेळी त्यावेळी यशस्वी ठरली होती.

२०१४ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्यातील मतविभागनीचा फायदा आमदार जगताप यांना कसा मिळाला ते पाहू. तीन प्रमुख विरोधकांना मिळालेली एकूण मते पाहिल्यावर मतविभागनीचे गणित लक्षात येते. जगताप यांना मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत या भागातून ६,३६९ मते होती, तर त्यांच्या विरोधकांना मिळून १०,०४६ मते मिळाली होती. वाल्हेकरवाडी मध्ये जगताप यांना ४,८२४ आणि विरोधकांना मिळून ७,५४४ मते होती. भाऊसाहेब भोईर यांच्या बिजलीनगर, दळवीनगर, चिंचवडगाव या पट्ट्यात जगताप यांना १८,०७९ आणि विरोधकांना जवळपास बरोबरीत म्हणजे १६,८४९ मतदान होते.

पुनावळे मध्ये जगताप ६७७ आणि विरोधकांना त्यांच्या तिप्पट म्हणजे १,८८९ मते होती. खासदार श्रीरंग बारणे यांच्या थेरगाव मध्ये १०,८४९ मते घेणाऱ्या जगताप यांच्यापेक्षा एकट्या कलाटे यांना जास्त म्हणजे १२,८४७ आणि विरोधकांची मिळून १८,५०१ मते होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या काळेवाडीत त्यावेळी जगताप यांना ११,००१ तर कलाटे यांना ७,८२६ आणि विरोधकांची मिळून १८,७२५ मते पाहिल्यावर कल स्पष्ट होतो. रहाटणी मध्ये जगताप हे ४,७४० तर सर्व विरोधक मिळून ६,८३९ मतदान होते. जगताप यांना त्यांच्या बालेकिल्लाने नेहमीच मोठी साथ दिली. त्यामुळे पिंपळे सौदागरला त्यांना ८,९८९ आणि कलाटे यांना अवघी १,३७८ तर विरोधकांची मिळून ७,३२३ मते होती. राहुल कलाटे यांचे वर्चस्व असलेल्या वाकडमध्ये कलाटे यांना ८,८९८ आणि जगताप यांना ६,८८० तर सर्व विरोधी उमेदवारांची मिळून १०,४०७ मते होती. पिंपळे निलखमध्ये जगताप यांना ४,९८६ तर विरोधकांनी मिळून जवळपास तितकीच म्हणजे ४,०५७ मते घेतली.

पिंपळे गुरव,सौदागर, नवी सांगवीची कायम जगतापांना साथ –
आमदार जगताप यांना कायम तारले ते त्यांच्या पिपळे गुरव, नवी सांगवी येथील मतदारांनी. त्यावेळी जगताप यांना सर्वाधिक ३०,१४५ मते तेथून घेतली तर सगळे विरोधातील कडबोळे एकत्र केले तरी ६,९७२ च्या पुढे मते गेली नाहीत. म्हणजे सगळा बॅकलॉग इथे भरून निघाला. सांगवी नवी सांगवीच्या दुसऱ्या टप्प्यातसुध्दा जगताप यांचेच वर्चस्व कायम राहिलेले दिसते. तिथे त्यांना १५,९१२ आणि विरोधकांना १०,५४४ मते मिळाली होती. जिंकलेल्या लक्ष्मण जगताप यांना १,२३,४५१ मते आणि काँग्रेसचे कलास कदम (८,६४३) यांच्यासह सर्व विरोधकांना मिळालेली मते १,२८,६३७ होती. जगताप ६०,१२१ मतांनी जिंकले, पण सर्व विरोधकांना त्यांच्यापेक्षा ५,१८६ मते अधिकची होती. मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडली ते अगदी सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

आमदार जगताप विरोधात सर्व पक्ष
२०१९ मध्ये दुरंगी लढतीत सर्व विरोधकांवरसुध्दा आमदार जगताप यांनी मोठ्या खुबीने मात केली होती. पूर्वीपेक्षा त्यांचे मताधिक्य झपाट्याने घसरले होते, असे आकडेच बोलतात.
मतादारांची संख्या वाढली तरी टक्केवारी सरासरी ५५ ते ५६ टक्केच होती. जगताप यांना त्यावेळी १,५०,४८८ तर त्यांचे प्रतिस्पर्धी सर्व पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना १,११,९९४ मते होती. पूर्वीचे ७५ हजार, नंतर ६० हजाराचे
मताधिक्य या निवडणुकित ३८,४९४ पर्यंत घसरले होते. कलाटे यांनी दिलेली लढत खूप लक्षवेधी ठरली होती. जगताप यांच्या विरोधातील सर्व नाराजी एकवटल्याने तो झटका झाला. जगताप यांच्यासाठ ही तशी धोक्याची घंटा होती. आता सद्याच्या या पोटनिवडणुकित जगताप स्वर्गवासी झाल्याने त्यांच्या पत्नी अश्विनीताईंना सहानुभूतीचा फायदा होईल. पण कलाटे, काटे या पुर्वीच्याच उमेदवारांचे आक्रमण त्या कशा थोपवून धरतात ते पहायचे.

कुठे बरोबरी, कुठे पिछाडी
२०१९ मध्ये मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत मधून जगताप यांनी ९,२८८ आणि कलाटे यांना ८,३४५ मते होती. फक्त हजार मतांचा फरक होता. वाल्हेकरवाडीत जगताप ६,७५६ आणि कलाटे – ६०७२ अशी कटोकटी गणती होती. बिजलीनगर, दळवीनगर, चिंचवडगाव परिसरातून जगताप २४,१०८ आणि कलाटे यांना १६,४०४ मतदान झाले होते. भाजपच्या बालेकिल्ल्यात कलाटे यांना मिळालेली मते ही तशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचीच होती, आता ती काटे यांच्या बरोबर आहेत. पुनावळेमध्ये १५३२ जगताप यांना तर १७०७ कलाटेंना होती. थेरगाव मध्ये जगताप – १४,७७२ आणि कलाटे – १५,६१३ अशी तर काळेवाडीत जगताप – ११,११७ आणि कलाटे – १०,६०२ अशी जवळपास बरोबरीतील मते दोघांनाही मिळाली होती. रहाटणीमध्येसुध्दा जगताप – ११,०१० आणि कलाटे – ९,८१२ अशी अवघ्या हजार फरकाने मते होती. मात्र, नंतर जगताप यांच्या बालेकिल्ला सुरु झाला आणि तिथेच कलाटे मागे पडले. पिंपळे सौदागर (जगताप – ७,८९२, कलाटे – ३,८००), वाकड (जगताप – ९,०४६, कलाटे – ८,९२०), पिंपळे निलख (जगताप – ५,२७०, कलाटे – ५,१९२), पिंपळे गुरव व नवी सांगवी ( जगताप – ३६,०९९ , कलाटे – १३,३९८) आणि सांगवीमध्ये (जगताप – १३,५९८, कलाटे – ११,५८९) असे जगताप यांचे मताधिक्य होते. अन्य अपक्ष उमेदवारांची मिळून अवघी आठ हजार मते होती.

आजची परिस्थिती काय सांगते –
श्रीमती जगताप या त्यांच्या पतीच्या जागेवर उमेदवार आहेत. कलाटे, काटे हे दोघे याहीवेळी रिंगणात आहेत. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकित आणि आताच्या पोटनिवडणुकितील परिस्थिती जवळपास एकच आहे. उलटपक्षी श्रीमती जगताप यांच्या मागे सहानुभूती आहे. जगातप यांच्याबद्दल नाराजी होती म्हणून त्यांच्या विरोधातील मते वाढत गेली, पण तो न्याय त्यांच्या पत्नीबाबत लागू पडत नाही. मोदी फॅक्टर आजही तितकाच प्रभावी असल्याने तोसुध्दा श्रीमती जगताप यांच्या पथ्यावर आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे आणि विलास लांडे हे काटे यांच्याएवजी मित्राची पत्नी म्हणून लपूनछपून श्रीमती जगताप यांच्यासाठी काम करतात. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे, कारण आगामी महापालिका पुन्हा जिंकायची तर जगताप यांचा विजय महत्वाचा आहे. जिथे जिथे पूर्वी जगताप यांना कमी मते होती तिथे भाजपची यंत्रणा काम करते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच नाना काटे हे महाआघाडीचे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. पूर्वी एकास एक अशी लढत होती म्हणून कलाटे यांना १ लाख १२ हजार मते मिळाली, मात्र २०१४ मध्ये हेच तीन उमेदवार असताना अवघी ६७ हजार मते होती. आता यावेळी कलाटे एकटेच लढत आहेत, पण पूर्वीच्याच सर्व हितचिंतकांचा त्यांना पाठिंबा असल्याने ते जोमात आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्वतः अजित पवार यांनी त्यांना माघारीसाठी विनवण्या केल्याने त्यांचे महत्व वाढले. उध्दव ठाकरे यांनी त्याबाबत चकार शब्द काढला नाही म्हणून गूढ वाढले आहे. काटे, कलाटे हे दोघे किती मतांची भागीदारी करतात यावर जगताप यांचे जय पराजयाचे समिकरण आहे. पोटनिवडणूक असल्याने जास्तीत जास्त ४५ टक्के मतदान होईल म्हणजे ५ लाख ६८ हजारापैकी अडिच लाख मतांमध्ये हा सगळा खेळ आहे. मतदानाला पाच दिवस आहेत आणि प्रचार शिगेला पोहचलाय. रात्रीतून बाजी पलटू शकते. पवार, फडणवीस, शिंदे, ठाकरे सगळे नेते तळ ठोकून आहेत. २०१४ आणि २०१९ चे आकडे नजरेखालून खातले की कोण बाजी मारणार याचा अंदाज तुम्हीसुध्दा लावू शकता