चिंचवडमध्ये गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

0
252

पिंपरी दि. १० (पीसीबी) – फुलांनी सजवलेल्या रथांची रेलचेल…लक्षवेधक चित्ररथ… ..ढोल-ताशांचा दणदणाट…आकर्षक विद्युत रोषणाई…गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष.. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… अशा जयघोषात लाडक्या गणरायाला चिंचवडकरांनी शुक्रवारी (दि.9) निरोप दिला.

गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट होते. त्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्याने उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आमगन झाले. हाच उत्साह आणि जल्लोष गणेश मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्येही दिसून आला. रात्री बारा वाजेपर्यंत 34 गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. दुपारी सव्वा तीन वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली.  मिरवणुक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल नऊ तास चाललेली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

चिंचवड, चापेकर चौकात महापालिकेच्या  वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, माजी  नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, माधुरी कुलकर्णी,  माजी नगरसेवक राजेंद्र गावडे,  सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.

वेताळनगर येथील शिवतेज मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक दुपारी सव्वा तीन वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. रात्री साडे आठ वाजेपर्यंत 11 मंडळे विसर्जनासाठी घाटाकडे गेली होती. त्यानंतर नऊच्या सुमारास चिंचवडचा राजा मित्र मंडळाची मिरवणूक चौकात दाखल झाली. त्यांनी आकर्षक असा ‘भक्तीरथ’ उभारला होता. त्यात विठ्ठल-रुक्मिणी, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती होत्या. बाल वारकऱ्यांनी भजन सादर केले. ढोल ताशा पथकाने अतिशय लयबद्ध वादन केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पांढरी टोपी परिधान केली होती. ज्ञानदीप मित्र मंडळाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा साकारला होता. गांधी पेठ तालीम मंडळांनेही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा केला होता. मिरवणुकीत दांडपट्टा, लाठीकाठी असे मर्दानी खेळ सादर केले. शिवदर्शन ढोल पथक सहभागी झाले होते.

त्यानंतर क्रांतीविर भगतसिंह मित्र मंडळाचे बाप्पा फुलांनी सजवलेल्या पालखीतुन दाखल झाले. आरशाच्या डिझाईनचे मंदिर साकारले होते. महिलांनी पालखी खांद्यावर घेतली होती. मुंजोबा मित्र मंडळाने लक्षवेधी असा ‘कृष्णरथ’ साकारला होता. कानिफनाथ झांज पथकाने वादन केले. भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांचा मिरवणुकीत मोठा सहभाग होता. गावडे कॉलनी मित्र मंडळाने ढोल ताशाच्या दणदणाटात बाप्पाला निरोप दिला. चिंचवडगावातील मोरया मित्र मंडळाने शंकराची प्रतिकृती साकारली होती. लोंढेनगर येथील आदर्श तरुण मित्र मंडळाने क्रांतिकारकांच्या प्रतिमा लावल्या होत्या आणि फुलांची सजावट केली होती. भोई आळीतील उत्कृष्ट तरुण मित्र मंडळाने फुलांची मनसोक्त उधळण केली. त्यानंतर नवतरुण मित्र मंडळाचे मिरवणूक चौकात आगमन झाले. मंडळाने ‘बालाजी रथ’ साकारला होता. मानाचा गणपती असलेल्या अष्टविनायक मंडळांच्या मिरवणुकीचे चौकात आगमन झाले. मंडळाने शंकराची पिंड साकारली होती. गावडे पार्क मित्र मंडळाने  लक्षवेधक ‘सुवर्णरथ’ साकारला होता.  

श्रीमान महासाधू मोरया गोसावी मित्र मंडळाने ‘विठ्ठलरथ’ साकारला होता. विद्युत रोषणाई केली होती. ओम साई मित्रमंडळाने भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण केली. नवनाथ मंडळाच्या मिरवणुकीत ज्ञाप्रबोधिनीच्या मुलींच्या ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. समता तरुण मंडळाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा साकारला होता.  नवभारत तरुण मंडळाचे गणराय आकर्षक फुलांच्या सजावटीमध्ये विराजमान झाले होते. शिवाजी उदय मंडळाने हिमालयाची पर्वत प्रतिकृती साकारली होती. समर्थ कॉलनी मित्र मंडळाने विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली होती.

चिंचवडगावातील श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाने ‘बालाजी रथ’ साकारला होता.  मयुरेश्वर मित्र मंडळाने ‘शिवरथ’ साकारला होता. रथामध्ये मनमोहक शंकराची मूर्ती होती. बारा वाजता चौकात आलेल्या एम्पायर एस्टेट  मित्र मंडळाची विठ्ठलाची भव्य प्रतिकृती गणेश भक्तांचे लक्ष्य वेधून घेत होती. श्री मयुरेश्वर मित्र मंडळाने विठ्ठलरथ साकारला होता. बारानंतर आलेले उत्कृष्ट मित्र मंडळ शांततेत विसर्जन घाटाकडे रवाना झाले.