चिंचवडमध्ये एकाचवेळी ६०० साधकांनी घेतले योगाचे धडे योगदिन उत्साहात साजरा

0
3

पिंपरी, दि. २१ – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, पवना ग्रुप आणि सोहम योगसाधना संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित योग कार्यक्रमात ६०० जणांनी सहभाग घेतला. एकाचवेळी ६०० साधकांनी योगाचे धडे घेतले. योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

चिंचवड, पवनानगर येथील काशीधाम मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवी नामदे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे ,भाजप कार्यकारिणी सदस महेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या.

योग शिक्षक दिगंबर उचगांवकर व अनुजा उचगांवकर यांनी सर्वांना योगाचे धडे दिले. सुरुवातीला योगासाठीच्या पूरक हालचाली झाल्या. त्यानंतर सूर्यनमस्कार झाले. शय स्थितीमधील पवन मुक्तासन, शेतु बंधासन झाले. बैठक स्थितीमधील वज्राअसान, शशांक आसन, दंड स्थितीतील वृक्षासन, ताडासन आणि त्रिकोण आसन झाले. प्राणायाम, कपालभाती, अनुलो मिलोम, ब्राम्हरी प्राणायाम झाले. विश्वशांती प्रार्थनेने समारोप झाला. योग कार्यक्रमात परिसरातील ६०० जणांनी सहभाग घेतला. युनिक व्हिजन स्कुलचे विद्यार्थी, शिक्षकही सहभागी झाले होते.

पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘शारीरिक आणि मानसिक लाभ मिळून शरीर अधिक लवचिक होण्यासाठी योगाचा फायदा होतो. शरीर निरोगी, बळकट ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व असून योगाभ्यास केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
मधुमेहासारख्या रोगासाठीही योग फायदेशीर ठरते. ध्यानधारणा केल्याने मानसिक त्रासापासून सुटका मिळते आणि मन अधिक शांत होते. चिडचिड होत नाही. शरीर अधिक निरोगी राहाते.
वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त फायदा योगाचा होता.
मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्यात योगाचा सार आहे. लवचिकता आणि सामर्थ्य वाढविण्याच्या क्षमतेद्वारे जीवनातील योगाचे महत्त्व लक्षात येते. शिवाय, ते तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यात मदत करते, अशा प्रकारे मानसिक स्पष्टता आणि भावनिक स्थिरता वाढवते. त्यामुळे दररोज योगा केला पाहिजे’.