चिंचवडमधून महाविकास आघाडीकडून साहेबांच्या राष्ट्रवादीचे तुषार कामठे ?

0
169

चिंचवड, दि. १५ –
प्रत्यक्ष निवडणुकिला दोन महिने बाकी आहे, पण चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून घमासान लढाई सुरू आहे. विधानसभा निवडणूक १५ ते २० ऑक्टोंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमध्ये भाजपच्या आमदार अश्विनी जगताप सद्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. पक्षांतर्गत जागा वाटप फॉर्म्युल्यानुसार ही जागा भाजपकडेच राहणार आहे. भाजमधून स्वतः आमदार अश्विनी इच्छुक होत्या, मात्र त्यांचे दीर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. भाजपमधून शंकर जगताप यांना संधी दिलीच तर १५ नगरसवेक वेगळा विचार करतील अशी वल्गना शत्रुघ्न काटे यांनी केली होती. प्रत्यक्षात स्वतः काटे हेसुध्दा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. दीर-भावजय वादावर पडदा पडला आणि शंकर जगताप हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले, मात्र बंडाची भाषा कऱणाऱ्या शत्रुघ्न काटे यांचे ताबूत आजही थंडच आहेत. दुसरे भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते हे लढण्याच्या मूडमध्ये आहेत, पण तेसुध्दा शांत झालेत. महायुतीचा दुसरा भागीदार पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी सत्ताधारी नेते नाना काटे यांनी या जागेवर आणि उमेदवारी दावा सांगितला होता. या दोघांनीही प्रचार मोहिम सुरू ठेवली आहे. दादांच्या राष्ट्रवादीत मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे यांचीही नावे चर्चेत असतात पण प्रत्यक्षात या दोघांची कुठलीच हालचाल दिसत नाही.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे हे तयारीत आहेत. यापूर्वी तीन निवडणुका लढल्या आणि हारल्या मात्र, पुन्हा नव्या दमाने ते रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटलीच तर, अजित दादांना रामराम करून भोईर हेसुध्दा शिवसेनेत प्रवेश करतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीचा दुसरा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवारीसाठी जवळपास सर्वच इच्छुकांनी शरद पवार यांचा उंबरा झिजवला. सुरवातीला अल्प प्रतिसाद होता. आता राज्याच्या विविध सर्वेक्षण अहवालातून महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते, असा निवडणूकपूर्व अंदाज समोर आल्याने खळबळ उडाली आहे. परिणामी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असंख्य नेते कार्यर्त्यांचा ओघ वाढला आहे. अशा परिस्थितीत पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी लढण्याची सुप्त इच्छा प्रक केली. इतकेच नाही तर त्यांनी थेट प्रचार सुरू केल्याने सर्व राजकारण अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहे. कामठे यांनी अचानक उचल खाल्लायाने महाविकास आघाडीतील अन्य घटकपक्षांत काहिशी अस्वस्थता आहे. प्रचाराच्या हेतुने कामठे यांनी चिंचवड मतदारसंघात मामुर्डी ते दापोडी तसेच रावेत, प्राधिकरण, वाकड, काळेवाडी, पुनावळेसह सर्व प्रमुख रस्त्यांवर स्वतःचे होर्डिंग लावलेत. भावी आमदार म्हणून त्यांच्या स्वतःच्या फोटोसह आमदार रोहित पवार यांचे देखील मोठ मोठे फोटो फलकावर आहेत. विशेष म्हणजे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे फोटो लहान साईजचे आहेत. खुद्द शरद पवार यांनीच थेट प्रचाराला लागण्याचा आदेश दिल्याचे कामठे समर्थक सांगतात. महाविकास आघाडीत या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने हक्क सांगितलेला असताना कामठे प्रचाराला लागल्याने अन्य इच्छुकांमध्ये चलबीचल आहे.