चिंचवडच्या पवना नदी घाटावर छठपूजा भक्तिभावपूर्वक वातारणात उत्साहात साजरी..

0
338

पिंपरी चिंचवड शहरावरील प्रदूषणाचे सावट हटू दे; सुख, समृध्दी, आरोग्य, लाभू दे..

उत्तर भारतीय कुटुंबांकडून सूर्यदेवाकडे प्रार्थना…

चिंचवड, दि.२० (पीसीबी) :- चिंचवडगावातील पवना नदी घाटावर उत्तर भारतीयांचा छठपूजा उत्सव रविवारी (दि. १९) उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय कुटुंबांनी भक्तिभावाने सुर्योपासना केली. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

भाविकांनी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदरच छटमाईची पूजा मांडून तिथे विधिवत पूजा केली. या मांडणीमध्ये उसाला महत्व असते. चारही बाजूने ऊस पुळणीत रोवून उसाचा मांडव करून त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेऊन त्यावर दिवा पेटवला आणि त्यावर विटाची मांडणी करून पूजेची मांडणी केली. त्यासमोर खवा, गव्हाचं पीठ आणि तुपापासून बनवलेला प्रसाद आणि फळं यांचा नैवेद्य दाखविला आणि गाईच्या दुधाचे सूर्याचा अस्त होताना महिलांनी अर्घ्य दिले.

आपल्या कुटूंबाला सुख, समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे यासाठी महिला सूर्याची उपासना म्हणून छटपुजेचे व्रत करतात. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याची प्राचिन काळापासूनची श्रध्दा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्‍या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरणाप्रती समर्पणाची भावना आहे, असे येथील भाविकांनी सांगितले.

हनुमान मित्र मंडळाच्या वतीने पवना नदी घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. भाविकांच्या ” जय छठमाता ” च्या गजराने वातावरण प्रसन्न झाले होते. उद्या सोमवारी (दि. २०) रोजी याच घाटावर सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करण्यात येणार आहे.

आयोजक विजय गुप्ता म्हणाले, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला सूर्याची आराधना अर्थात छठपूजा करण्याची परंपरा आहे. सर्व देशभर छठपूजेचा सण उत्साहात साजरा केला जातो. एकूण चार दिवस चालणाऱ्या या सूर्य उपासनेच्या पर्वाला शुक्रवार (दि. १७) पासून प्रारंभ झाला असून उद्या सोमवारी (दि. २०) रोजी सूर्य पूजनाने छठ पर्वाची समाप्ती होणार आहे. हिंदू शास्रानुसार छठपूजेला सूर्यछठ अथवा छठपर्व म्हणतात. हा दिवस भगवान सूर्य नारायणाला समर्पित आहे. छठपूजेचे व्रत कठीण असले तरी स्त्री-पुरुष हे व्रत भक्ती-भावाने करतात. हा सण मोठ्यांचा आदर करायला शिकवतो. गेल्या २० ते २५ वर्षांपासून आम्ही या ठिकाणी छटपूजेचा उत्सव साजरा करत आहोत. येथील स्थानिकांचे देखील या उत्सवामध्ये आम्हाला चांगले सहकार्य लाभत आहे. शहरावरील प्रदूषणाचे सावट हटू दे अशी प्रार्थना सूर्यदेवाकडे भाविकांनी केली.

यावेळी भाजपचे राम वाकडकर, सामाजिक कार्यकर्ते खंडुशेठ चिंचवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

छठपूजा उत्सवात हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, छठ पूजा समितीचे संस्थापक जयप्रकाश नारायणप्रसाद गुप्ता, अध्यक्ष जितेन्द्र गुप्ता, कार्याध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव पूर्वाचल विकासमंच, छठपूजा स. सदस्य जितेंद्र गुप्ता, उपाध्यक्ष देवानंद गुप्ता, सेक्रेटरी अशोक गुप्ता, फिल्म प्रोड्युसर प्रेम शंकर राय, पूर्वाचल विकास मंचचे अध्यक्ष विकास मिश्रा, मुन्ना गुप्ता, अनिल गुप्ता, उमा गुप्ता, सचितानंद मिश्रा, टी. तिवारी, सुभाष गुप्ता, श्यामसुंदर गुप्ता, मदन गुप्ता, पप्पू गुप्ता, सुजित गुप्ता, शंकर गुप्ता, शंभू गुप्ता, रमेश गुप्ता, भोला गुप्ता, मनोज गुप्ता, राजेश गुप्ता, विनोद गुप्ता, संतोष गुप्ता, संजिव गुप्ता, प्रिंस गुप्ता, विनोद गुप्ता, प्रविण गुप्ता, राजकुमार गुप्ता, नरेंद्र गुप्ता, रमेश गुप्ता आदींनी मोलाचे सहकार्य केले.