चिंचवडची पोटनिवडणूक बेरोजगारी, महागाई अन् दादागिरीच्या विरोधात – मेहेबूब शेख यांची भाजपवर टीका

0
259

पिंपरी, दि. १५ (पीसीबी)- चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही देशात निर्माण झालेल्या बेरोजगारी, महागाई आणि दादागिरीच्या मुद्यांवर लढविली जात आहे. राष्ट्रवादीने सर्वसामान्यांची लढाई आता आपल्या हाती घेतली असून भाजपच्या हुकुमशाही कारभारातून मुक्त व्हायचे असेल तर परिवर्तन झालेच पाहिजे. भाजपने आपल्या सत्ताकाळा केवळ भुलथापा मारून नागरिकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे बदल घडविण्यासाठी सर्वांनी नाना काटे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहेबूब शेख यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने चिंचवड विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपळे सौदागर येथे बुधवारी (दि. १५) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेख बोलत होते.

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामटे, प्रदेश उपाध्यक्ष मयूर गायकवाड, विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस गौतम आगा, चिंचवडचे निरीक्षक महेश हांडे, प्रदेश सचिव डॉ. अरुण शिंदे, पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे, पुणे शहर कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुळे तसेच पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष इम्रान शेख आणि पदाधिकाऱ्यांनी केले होते. यावेळी युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना शेख म्हणाले की, आमचा विरोध भाजपच्या हुकूमशाही व लोकविरोधी कारभारा बद्दल आहे. देशात गेल्या ७० वर्षांत इतरांनी काहीच केले नाही, केवळ भाजपने विकास केल्याच्या भूलथापा मारल्या जात आहेत. सर्वांनी आता भाजपचा खोटारडेपणा ओळखला आहे. देशाचाच नव्हे तर पिंपरी-चिंचवड विकास केवळ आणि केवळ राष्ट्रवादीच्याच काळात झाला, हे सत्य सर्वांनीच मान्य केले आहे. हिंजवडीसारखी आयटीनगरी उभारण्याचे श्रेयही शरद पवार यांनाच जाते.
भाजपच्या काळात केवळ दादागिरी, भ्रष्टाचार आणि भूलथापा याच बाबी घडल्या आहेत. कोणताही विकासाचा अजेंडा न ठेवता केवळ जनतेमध्ये भ्रम पसरविणे हा एकमेव उद्योग या लोकांनी चालविला आहे.

मात्र जनता हुशार आहे. त्यांना आता या बाबी समजल्या असल्यामुळे चिंचवडमध्ये यावेळी परिवर्तन घडणार आणि नाना काटे हे प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वासही शेख यांनी बोलून दाखविला. यानंतर राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. तसेच नाना काटे यांच्या विजयासाठी ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे सध्या निवडणूक प्रचारात आघाडीवर असून त्यांची लोकप्रियता कमालीची वाढत आहे. त्यामुळे भाजपाला त्यांचा पराजय डोळ्यांनी दिसत असून त्यांनी केलेल्या कामावर न बोलता ते फक्त सहानभूतीवर निवडणूक लढत आहेत. प्रत्येक ठिकाणी भावनिकतेच्या मुद्द्यावर मते मागत आहेत. मात्र चिंचवडच्या जनतेला विकास आणि भावनिक मुद्दे कळत असल्यामुळे यावेळचे मतदार हे भावनिकतेवर नव्हे विकासाच्या अजेंड्यावरच होणार असल्याचे रविकांत वर्पे म्हणाले.

यावेळी बोलताना युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, भाजपने महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळविले आहेत, त्यांनी गुजरातमध्ये जाऊन मतदान मागावे. पुणे जिल्ह्यातील तळेगावसह इतर अनेक प्रकल्प गुजरातला दान करून महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करणाऱ्यांनी यापूर्वीही वेळोवेळी खोटी आश्वासने दिली. निवडणुकीनंतर त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केवळ मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीने भाजपचा कारभार सुरू आहे. त्यामुळे चिंचवडची निवडणूक ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असून असून या लढाईत नाना काटे हे पन्नास हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजयी होतील, अशी खात्रीच शेख यांनी बोलून दाखविली.