चिंचवडची जागा राष्ट्रवादीला द्या, मागणीला माजी नगरसेवकांचा मोठा प्रतिसाद

0
158
  • भाजपमधील अस्वस्थता वाढली, राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होणार

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – भाजपच्या ताब्यातील चिंचवड विधानसभेवर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा हक्क आहे आणि कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाला पाहिजे, या भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळता आहे. माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या मागणीचा रेटा वाढ असल्याने भाजप नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे आणि विनोद नढे या चार माजी नगरसेवकांनी दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादीतून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, वाढता प्रतिसाद पाहून आम्ही कार्यकर्त्यांचा एक मेळावा आयोजित करणार असल्याचे कलाटे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या मागणीवर कोणाचे काय मत आहे ते आजमावण्यासाठी शितोळे, कलाटे, भोंडवे आणि नढे यांनी दोन दिवसांचा दौरा केला. काळेवाडी, वाल्हेकरवाडी, चिंचवड, रावेत, थेरगाव या भागातील माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांनी चर्चा केली. सर्वांनी यापूर्वीच ही मागणी करायला पाहिजे होती, आता सुरवात केली आहे तर माघार घेऊ नका, भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या मतदारसंघात मोठी आहे, असे मत व्यक्त केले. आजवर लोकसभा, विधानसभेला भाजपने आपल्याला वापरून घेतले किमान आता शहाणे व्हा आणि महायुती ही जागा राष्ट्रवादीसाठी मागून घ्या, अशी सुचना सर्वांनी केली. गेल्या दोन्ही निवडणुकीत भाजप विरोधात राष्ट्रवादीती बरोबरीत नव्हे तर जास्तची ताकद दिसून आली फक्त बंडखोरीमुळे मतांची फाटाफूट झाली. आता तशी चूक करू नका आणि भूमिकेवर ठाम राहा, आम्ही सर्व बरोबर आहोत, वेळ पडली तर तुतारी घ्या, असा सूर असल्याची माहिती कलाटे यांनी दिली.

माजी महापौर अपर्णा डोके, पीसीएमटीचे माजी सभापती निलेश डोके, माजी नगरसेवक संतोष कोकणे, मनोज खानोलकर, दिलीप काळे, राजेंद्र साळुंखे, आशा सुर्यवंशी यांनी या मागणीसाठी सोबत यायचे आश्वासन दिले आहे, असे कलाटे म्हणाले. सुरवातीला चार जण होतो आता ही संख्या २० पर्यंत गेल्याचे त्यांनी सांगितले. गाठीभेटी घेत हा दोरा असाच सुरू ठेवणार असून पुनावळे, ताथवडे, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, सांगवी, नवी सांगवी असा दौरा करणार आहोत. याच आठवड्यात कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा आयोजित कऱण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपमधेही उमेदवारीवरून असंतोष खदखदत असल्याने तिकडचे १५ माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असे समजले.