दि.१६(पीसीबी) – ब्राम्हण मतदारांचा तब्बल २३,५०० मतांचा गठ्ठा असतानाही महापालिका निवडणुकीला चिंचवडगावात डावलले जात असल्याची तीव्र खंत या समाजात आहे. कायम सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात आघाडीवर असलेल्या तसेच ४५ वर्षे भाजपमध्ये सक्रीय असलेल्या महेश कुलकर्णी यांच्या व्हायरल झालेल्या फेसबूक पोस्टमध्ये या भावना व्यक्त झाल्याने खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रभाग क्रमांक १८, चिंचवडगावातून भाजपच्या उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा आहे. ५५,०१२ हजार लोकसंख्येच्या या प्रभागात तब्बल २३,५०० मतदार हे ब्राम्हण समाजाचे आहेत. संघ आणि भाजप विचारांशी एकरूप झालेला जो कोणी असेल त्याला अगदी डोळे झाकून एक गठ्ठा मते मिळतात. आजवर इथे ब्राम्हण समाजाचा विचार होत नसल्याची भावना या फेसबूक पोस्टमध्या काव्यातून व्यक्त केली आहे.
महेश कुलकर्णी यांची ही पोस्ट राजेंद्र सराफ यांनी शेअर केली आहे ती आम्ही जशी आहे तशी पुढे देत आहोत.
बघा यांचा सुरू झाला तमाशा…
फक्त वगळले सौ. पूजा सराफ, रविंद्र देशपांडे, आणि महेश कुलकर्णी यांचा गाशा गुंडाळायचे ठरवून चालले…
विधानसभा निवडणुकित मायक्रो प्लॅनिंगवर भर देत जगताप कुटुंबाने केला विचार….
भरघोस मतांनी निवडूण आले आपलेच आमदार…
मग महापालिका निवडणुकित स्वार्थीपणाचा कशाला हवा प्रचार… आपल्या देवाभाऊंनी पुढाकार घेऊन किती घेतला अपमानास्पदपणाचा भार…
पण लक्षात असू द्या रा. स्व. संघ शताब्दी निमित्ताने प्रथम राष्ट्र हाच आमच्या मानत कायम विचार…
चिंचवडगावात येत्या १८ ऑक्टोंबरला ब्राम्हण समाजाची एक बैठक आयोजित केली आहे, त्या निमित्ताने या फेसबूक पोस्टवर चर्चा सुरू झाली आहे. या प्रभागात एकूण लोकसंख्या ५५०१२ असून त्यात अनुसुचित जातीची ७,८८९ तर ब्राम्हण २३,५०० आहेत. चिंचवडगावात फक्त कुलकर्णी आडनावाचे ६,३०० मतदार आहेत, असा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय जोशी, देशपांडे, देव, रबडे, सराफ, कळसकर, कराडे आदींचा समावेश आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ब्राम्हण समाजाचा कधी विचार होत नाही. भाजपचेसुध्दा सर्व उमेदवार गावकी-भावकीचेच असतात असानाराजीचा सूर ब्राम्हण समाजात आहे. पूजा सराफ, रविंद्र देशपांडे, महेश कुलकर्णी यांचा प्रातिनिधीक उल्लेख करत या निष्ठावंतांचा गाशा गुंडाळायची याही वेळी तयारी सुरू असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
सराफ आणि देशपांडे हे सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रेसर असतात. महेश कुलकर्णी हे आजवर भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदावर सात वेळा, सलग १२ वर्षे शहर सरचिटणीस, दोन वेळा चिटणीस होते. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजराथ, दिल्ली, गोवा निवडणुकिसाठी त्यांनी जबाबदारी सांभाळली मात्र, महापालिका उमेदवारीसाठी त्यांनी तीन वेळा डावलण्यात आले. आता वेळ प्रसंगी ओबीसी आणि ब्राम्हण असा सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्मुला चालवावा लागेल, असे कुलकर्णी सांगतात.