हॉटेल मधील चौघे भाजले
चिखली, दि. 11 (पीसीबी) : गॅस सिलेंडर चालू स्थितीत असताना त्याचा रेग्युलेटर बदलण्याचा प्रयत्न केला. यावेळी गॅस लीक होऊन भडका उडाला. या घटनेत हॉटेलमधील चौघेजण भाजले गेले. ही घटना बुधवारी (दि. 9) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास सिद्धिविनायक हॉटेल, ताम्हाणे वस्ती, चिखली येथे घडली.
रूपाली भोसले (वय 36), दत्ता निकम (वय 27), वैभव मांडवे (वय 26), सोहम मराठे (वय 18) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, ताम्हाणे वस्ती, चिखली येथील सिद्धिविनायक हॉटेलमध्ये आग लागल्याची वर्दी रिजवान शेख यांनी पिंपरी चिंचवड अग्निशामक विभागाला दिली. त्यानुसार पिंपरी मुख्य तसेच प्राधिकरण, चिखली, तळवडे उपकेंद्र येथून बंब घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलमध्ये व्यावसायिक एलपीजी (19 किलो) सिलेंडरच्या नॉब मधून आगीच्या ज्वाला चार ते पाच फूट उंच चालू होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझवली.
एलपीजी सिलेंडर चालू स्थितीत असताना रेग्युलेटर बदलण्याचा हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी आगीचा भडका झाला असे प्रथमदर्शी व्यक्तीने सांगितले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी हॉटेलमधून तीन ज्वलंत आणि तीन मोकळे सिलेंडर वेळेत बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आगीमध्ये दोन शेगड्या, टेबल फॅन, एक्झॉस्ट फॅन, पाण्याची टाकी, इलेक्ट्रिक वायर्स, टेबल काउंटर, किचन साहित्य, सिलिंग असे नुकसान झाले. या आगीमध्ये चार जण भाजले गेले. त्यांना त्रिवेणी नगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आग वर्दीवर अग्निशामक अधिकारी सुनील फरांदे, बालाजी वैद्य, प्रमुख अग्निशामक विमोचक संपत गौंड, सारंग मंगरूळकर, संजय महाडिक, शहाजी कोपनर, मुकेश बर्वे, यंत्रचालक अमोल खंदारे, मयूर कुंभार, फायरमन अनिल माने, अंकुश बडे, वाहन चालक राजेश साखळे, प्रदीप धाटे, रतन सानप, ट्रेनि फायरमन साहिल देवगडकर, शिवाजी पवार, जगदीश पाटील, गौरव सुरवसे, आप्पासाहेब मिसाळ, स्वप्निल उचाळे उपस्थित होते.