चालत्या बसमध्ये मद्यपींनी बसचे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा उडाला थरकाप

0
147

भोसरी,दि.18 जुलै (पीसीबी) – मद्यपी दोघांनी बस थांबवून बसमध्ये चढून बस चालकाला दमदाटी करून चालत्या बसचे स्टेअरिंग हातात घेऊन बस वाकडी तिकडी चालवली. यावेळी बसची वाहनांना व नागरिकांना धडक बसली. ही घटना बुधवारी (दि. 17) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास भोसरी येथे घडली.

सचिन गुणाजी पारधे (वय 44, रा. पुणे स्टेशन) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष जाधव (वय 40), जितेश रमेश राठोड (वय 36, रा. महाळुंगे, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दारूच्या नशेत पीएमपी बसला हात दाखवला. बसमध्ये चढून दोघांनी बस चालक सुरज सुखलाल काळे (वय 24) यांना शिवीगाळ केली. चालकाच्या केबिन मध्ये जाऊन आरडाओरडा करून बसचे स्टेअरिंग आरोपींनी त्यांच्या हातात घेतले. आम्ही सुद्धा बस चालक आहोत, आम्हाला शिकवू नकोस, असे म्हणून आरोपींनी बस वाकडीतिकडी चालवत वाहनांना व नागरिकांना धडक दिली. फिर्यादी यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करून नखे ओरखडून जखमी केले. या घटनेत बसमधील प्रवासी घाबरले होते. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.