वाकड, दि. ९
कामावर ठेवलेल्या चालकाने पार्सलसह टेम्पो पळवून नेला. ही घटना मंगळवारी पहाटे दोन ते दुपारी बारा वाजताच्या दरम्यान ताथवडे यथे घडली.
सतीश शिंदे (रा. पवनानगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळ रा. चिंचोला गाव, जि. बीड येथील रहिवासी आहे. प्रणव शेषराव सोमवंशी (वय ३०, रा. मोरया कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) यांनी बुधवारी (दि. ८) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश शिंदे हा फिर्यादी सोमवंशी यांच्याकडे टेम्पोवर चालकाची नोकरी करीत आहे. आरोपीने फिर्यादी यांचा (एमएच १४ एलएक्स ०६४१) हा चार लाख रुपयांचा टेम्पो व त्यात असलेल्या अडीच लाखांच्या पार्सलसह एकूण सहा लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.